

T NEWS मराठी नेटवर्क –
सिरोंचा (प्रतिनिधी )
मोबाईल चार्जिगला लावणे एका कुटूंबासाठी जीवघेणे ठरले असून चार्जिंगदरम्यान लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील कोर्ला येथे समोर आली आहे़ सुदैवाने यादरम्यान घरातील सदस्य तेंदुपान तोडण्यासाठी जंगलात गेल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही़. मात्र या आगीत घरातील जीवनाश्यक साहित्यांची राखरांगोळी झाल्याने संपूर्ण कुटूंब उघड्यावर आले आहे़.
प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत तेंदू हंगाम सुरु असल्याने कोर्ला येथील लक्ष्मी मलाय्या तोगार यांचे संपूर्ण कुटूंबीय सकाळच्या सुमारास तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेले होते़ यादरम्यान कुटूंबातील सदस्यांनी घरात मोबाईल चार्जिंगला लावले होते़ दरम्यान चार्जर ओव्हरहीटिंग झाल्याने स्फोट झाला़ यामुळे घराला आग लागली, काही क्षणातच आगीने रुद्रावतार धारण करीत संपूर्ण घराला कवेत घेतले़ गावातील अनेक कुटूंब पाने तोडण्यासाठी जंगलात गेल्याने ही बाब उशिरा लक्षात आली़ त्यानंतर नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला़ मात्र या आगीत घरातील कपडे, तांदूळ, जीवनावश्यक साहित्यांसह संपूर्ण घर भस्मसात झाले़ यात लक्ष्मी तोगार यांचे प्रचंड नुकसान झाले असून संपूर्ण कुटूंब उघड्यावर आले आहे़ त्यामुळे तोगार कुटूंबियांना तत्काळ आऱ्थिक मदत द्यावी, अशी मागणी राकाँ कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम यांनी केली आहे़





























