उन्हाळी हंगामातील धान व मका खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा;अरुण भाऊ मुक्कावार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

110

T NEWS मराठी नेटवर्क –
अहेरी(प्रतिनिधी )विधानसभा क्षेत्रातील अहेरी, मुलचेरा व सिरोंचा तालुक्यात उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात धान व मका पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र शासनाकडून अद्याप खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नसल्याने शेतकरी बांधवांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यापाऱ्यांकडून कमी दराने माल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

याच पार्श्वभूमीवर अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व ठिकाणी धान व मका खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावेत तसेच शेतमालाला योग्य हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे कट्टर समर्थक अरुण भाऊ मुक्कावार यांनी केली आहे.

या संदर्भात गडचिरोली येथील निवासी उपजिल्हाधिकारी श्री. आशिष वानखेडे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात शेतकऱ्यांच्या अडचणींचा सविस्तर उल्लेख करून तातडीने खरेदी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदन स्वीकारताना निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वानखेडे यांनी सदर मागणीवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

सध्या उन्हाळी हंगामातील धान व मका विक्रीसाठी शेतकरी प्रतीक्षेत असून शासनाने त्वरित निर्णय घेऊन खरेदी केंद्र सुरू करावीत, अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here