

T NEWS मराठी नेटवर्क –
सिरोंचा (प्रतिनिधी )
तालुक्यातील शेतक-यांचे ऊन्हाळी हंगामातील धानाची कापणी होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला आहे़ मात्र अद्यापही तालुक्यातील धान खरेदी केंद्र सुरु झालेले नाही़ याबाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुनही ठोस निर्णय घेण्यात न आल्याने आक्रमक शेतक-यांनी १ जूनला नारायणपूर येथे चक्काजाम आंदोलन पुकारले़ कडाक्याच्या ऊन्हात शेतक-यांनी रस्त्यावर उतरून धान खरेदी केंद्र तत्काळ सुरु करण्याची जोरकस मागणी लावून धरली़ या आंदोलनादरम्यान जवळपास दोन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती़
तालुक्यातील शेतकरी ऊन्हाळी धान दरवर्षी आदिवासी महामंडळ केंद्रावर विक्री करीत आला आहे़ मात्र यंदा ऊन्हाळी धान निघून एक महिन्याचा कालावधी लोटूनही खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले नाही़ परिणामी शेतकरी आऱ्थिक अडचणीत सापडला आहे़ शेकडो शेतक-यांनी धान्यसाठा उघड्यावर ठेवल्याने धान खराब होण्याची भीती व्यक्त होत़ धान खरेदी सुरु न झाल्याने याचा फायदा खासगी व्यापारी घेत असल्याचा आरोप शेतक-यांकडून होत आहे़ हमीभावानुसार धाना २३६९ रुपये प्रतिक्विंटल दर असतांना सध्या व्यापारी १५०० ते १६०० रुपये असा अल्पसा दर धानाला देत आहे़ यामुळे शेतक-यांच प्रचंड आऱ्थ्िक नुकसान होत आहे़ वर्षभर मेहनतीने पिकवलेल्या धानाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आऱ्थिक संकटात सापडला आहे़ त्यामुळे तालुक्यातील शेतक-यांनी शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला़ मात्र अद्यापही खरेदी केंद्र सुरु न झाल्याने तालुक्यातील शेतक-यांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे़ या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अमरादी धान खरेदी केंद्र परिसरातील शेतक-यांनी प्रशासनाप्रती आक्रोश व्यक्त करीत सोमवारी नारायणपूर रस्त्यावर चक्काजाम आंदोलन पुकारला़ दरम्यान नायब तहसिलदार सिडाम यांनी घटनास्थळ गाठित शेतक-यांशी चर्चा केली़ मात्र आक्रमक शेतक-यांनी लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार कायम ठेवला़ दरम्यान नायब तहसिलदार यांनी गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून शेतक-यांची समस्या मांडली़ यावेळी त्यांनी पुढील दोन दिवसात गोदामातील धानाची उचल करुन खरेदी केंद्र सुरु करण्याचे ठोस आश्वासन दिले़ यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले़ याप्रसंगी अमरादी धान खरेदी केंद्राअंतर्गत येत असलेल्या अनेक गावातील बहूसंख्य शेतकरी उपस्थित होते़
सरकार आहे तरी कुठे?- शेतक-यांचा संतप्त सवाल
सिरोंचा तालुक्यातील शेतक-यांना दरवर्षी आविकामार्फत धान खरेदीसाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याची शोकांतिका यावेळी आंदोलनकर्त्या शेतक-यांनी व्यक्त केली़ भर कडाक्याच्या ऊन्हात धान उत्पादक शेतक-यांना वेठीस धरणारे आमचे लाडके महायूती सरकार आहे तरी कुठे? असा उद्विग्न सवाल शेतक-यांनी यावेळी उपस्थित केला़
नायब तहसिलदारांची यशस्वी मध्यस्थी –
सिरोंचा तालुक्यातील सर्वच शासकीय खरेदी केंद्र तत्काळ सुरु करण्यात यावे, या मागणीला घेऊन अमरादी खरेदी केंद्र परिसरातील अनेक गावातील जवळपास २०० ते ४०० च्यावर शेतक-यांनी नारायणपूर गावातील मुख्य रस्त्यावर सकाळी ९ वाजता ठिय्या दिला़ यादरम्यान जवळपास २ तास या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती़ दरम्यान आंदोलनाची माहिती प्राप्त होताच नायब तहसिलदार सिडाम यांनी घटनास्थळ गाठित शेतक-यांशी संवाद साधला़ यादरम्यान त्यांनी गडचिरोली कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक यांचेशी संपर्क साधून शेतक-यांची समस्या मांडली़ व्यवस्थापकांनी दोन दिवसात तालुकाभरातील खरेदी केंद्र सुरु करण्याचे ठोस आश्वासन देताच शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले़ यादरम्यान पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता़ या आंदोलनादरम्यान जवळपास २ तास या मार्गावरील ठप्प पडलेली वाहतूक पूर्ववत सुरु झाली़






























