माओवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला -जमिनीत पुरुन ठेवलेले स्फोटक साहित्य केले नट -गडचिरोली पोलिस दलाची कामगिरी

750

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
गडचिरोली(प्रतिनिधी)
गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांकडून शासनविरोधी घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर केला जातो. या प्रकारचे साहित्य सुरक्षा दलांना हानी पोहचविण्याच्या उद्देशाने जंगल परिसरात जमिनीमध्ये पूरुन ठेवले जाते. अशा पूरुन ठेवलेल्या साहित्याचा वापर माओवाद्यांकडून विविध नक्षल सप्ताहदरम्यान तसेच इतर प्रसंगी केला जातो. गडचिरोली पोलिस दलाने अशाच प्रकारचा माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव आज, 15 मार्च रोजी कवंडे पोस्टे हद्दीत उधळून लावला आहे.
उपविभाग भामरागड अंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोस्टे कवंडे येथे तैनात असलेल्या विशेष अभियान पथकाच्या जवानांना अभियानादरम्यान पोस्टे कवंडेपासून दक्षिणेला अंदाजे 100 मीटर अंतरावर असलेल्या पायवाटेवर झुडपांमध्ये लपवून ठेवलेली भरमार बंदूक मिळून आली होती. सदर माहिती वरिष्ठांना देण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बीडीडीएस पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बीडीडीएस पथकातील विविध अत्याधुनिक उपकरणांद्वारे सदर जंगल परिसरात शोध अभियान राबविण्यात आले. यावेळी भरमार बंदूक लपविलेल्या झुडपाशेजारी एक संशयित जागा मिळून आल्याने सदर घटनास्थळाची पाहणी केली असता, जमिनीमध्ये अंदाजे दीड ते दोन फुट खोलावर डेटोनेटरसाठी वापरण्यात येणा­-या लाल रंगाच्या वायरने बांधलेली प्लास्टीकची पिशवी मिळून आली. यावेळी पिशवीची बीडीडीएस पथकाकडून एक्सप्लोझिव्ह किटने तपासणी केली असता, त्यामध्ये स्फोटक पदार्थ असल्याची खात्री झाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्फोटक पदार्थ घटनास्थळावरच नष्ट करण्यात आले. तसेच सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, एम. रमेश, सत्यसाई कार्तिक तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कवंडेचे प्रभारी अधिकारी पोउपनि मंदार शिंदे, विशेष अभियान पथक व बीडीडीएस पथकाच्या जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली.

पोलिस अधीक्षकांनी केले जवानांचे कौतुक-
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले आहे. तसेच सदर जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. माओवाद्यांनी हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here