आरडा गावातील पाणी टाकी रामभरोसे, पाणी टाकी बनली शोभेची वस्तू -योजना कागदावरच; राजनापल्लीवासीयांची व्यथा

125

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या ग्रामपंचायत आरडा हद्दीतील राजनापल्ली येथील ग्रामस्थांना नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या हेतूने पाणी योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करुन गावात पाण्याच्या दोन टाक्या बांधण्यात आल्या. याअंतर्गत घरोघरी नळही बसविण्यात आले. मात्र टाक्या उभ्या राहूनही नळाला आजपर्यंत पाणी उपलब्ध होऊ न शकल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करुनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने राजन्नापल्लीवासीयांमध्ये प्रशासनाप्रती तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येतात. त्यानुसार सिरोंचा तालुक्यातील आरडा ग्राम ग्रामपंचायत येथे पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. लाखो रुपये खर्च करून जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम झाल्याने गावक-यांची पाण्यासाठीची वणवण थांबेल, असे वाटत होते. मात्र अजूनपर्यंत नळाला पाणीच पोहोचलेले नाही. इतका पैसा खर्च करून देखील पाण्यासाठीची वणवण थांबत नसेल तर ही योजना म्हणजे केवळ पैसे लाटण्यासाठीच होती का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
अतिदुर्गम आदिवासी भागात शासनाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाचे लक्ष नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावात पोहचताच सर्वप्रथम या दोन्ही पाणी टाक्यांचे दर्शन होते. त्यामुळे गावात मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत असेल, असे बाहेरुन येणा-यांना समज होतो. मात्र गावात गेल्यावर पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती लक्षात येते. ऊन्हाळ्याची दाहकता वाढणार असल्याने वेळीच ग्रामपंचायत प्रशासनाने उपाययोजना करुन नळ योजना कार्यान्वीत करावी, अन्यथा ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
-अद्यापही ग्रामवासीयांना शुद्ध पाणी उपलब्ध न झाल्याने पाणीपुरवठा योजना केवळ शोभेची वास्तू ठरली आहे. जिल्हा प्रशासनाने सदर पाणीपुरवठा योजना त्वरित कार्यान्वित कशी करता येईल, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. तसेच ही योजना केवळ कागदावरच पूर्णत्वास नेणा-या संबंधित व्यक्तींची चौकशी करुन त्यांना कठोर शासन करावे, अशी मागणीही नागरिकांमधून केली जात आहे.
-आरडा ग्रा. पं. अंतर्गत आरडा व राजन्नापल्ली या दोन गावांसाठी दोन पाण्याच्या टाक्या उभ्या करण्यात आल्या आहेत. मात्र या दोन्ही पाणी टाक्यातून अद्यापही नळाला पाणी सोडण्यात न आल्याने येथील पाणी पुरवठा योजना मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपाचा आधार घ्यावा लागत आहे. परिणामी शुद्ध पाण्यासाठी महिलांसह लहान, मोठ्या व्यक्तींची दमछाक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here