जानमपल्लीत विहिरी बांधकामादरम्यान दरड कोसळल्याने दोन मजूर ठार -सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली येथील घटना -एका मजुरास सुरक्षित बाहेर काढण्यात यश

1183

तिरुपती चिट्याला

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-

सिरोंचा (प्रतिनिधी)
शेतशिवारातील विहीरीचे बांधकाम करीत असतांना दरड कोसळल्याने तब्बल 10 फुट मातीखाली दबून दोन मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी, (दि.8) सकाळी 10 वाजताच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली येथे घडली. कोंडा समय्या (35) व रवी उप्पूला (30) दोघेही रा. जामनपल्ली अशी मृतक मजूरांची नावे आहे. तर कोनम संपत बानय्या याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आहे. रात्रो उशिरापर्यंत बचाव पथकाद्वारे दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरुच होते. या घटनेमुळे जानमपल्लीसह परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार सिरोंचा तालुका मुख्यालयापासून 8 किमी अंतरावर असलेल्या जानमपल्ली येथील शेतकरी धन्नाडा समाक्का या शेतक-याच्या शेतात विहीरीचे बांधकाम सुरु होते. विहिरीचे खोदकाम जवळपास 50 फुटापर्यंत झाले होते. विहिर बांधकामावर गावातीलच कोंडा समय्या, रवी उप्पूला व कोनम बानय्या हे तिघेही मजूर म्हणून काम करीत होते. नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास विहिर खोदकाम सुरु असतांना अचानक विहिरीच्या खालच्या भागातील दहा फुटापर्यंतची माती कोसळल्याने यात तिघेही मजूर दबल्या गेले. घटनेची माहिती प्राप्त होताच ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेत माती काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले. फावडे, बादल्या, दोरी आणि जेसीबी मशीनच्या मदतीने माती काढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. यात संतोष कोनम यालाच सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. घटनेची माहिती सिरोंचा पोलिसांना मिळताच पोलिसांनीही घटनास्थळ गाठले. जवळपास 10 फुट मातीखाली मृतदेह दबून असल्याने जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. वृत्त लिहीस्तोवर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले नव्हते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून –
घटनेची माहिती प्राप्त होताच सिरोंचा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समाधान चव्हाण, तहसीलदार निलेश होनमोरे, नायब तहसीलदार हमीद सय्यद यांचेसह पोलिस पथक व महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळ गाठित बचाव कार्य सुरु केले. मात्र मृतदेह विहिरीत जवळपास 10 फुट मातीखाली दबल्या गेल्याने बचाव पथकाला अनेक अडचणी येत होत्या. पोलिस दल, आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाद्वारे मलबा काढण्यासाठी तीन जेसीबीसह मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ युद्ध्पातळीवर प्रयत्नरत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक, तहसिलदार निलेश होनमोरे, नायब तहसिलदार हमीद सय्यद आदी वरिष्ठ अधिकारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते.

रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरुच –
विहिरीच्या मलब्याखाली दबलेल्या तिघांपैकी एकास सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. मात्र दोन मृतदेह अद्यापही दबून आहेत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी तीन जेसीबीसह पोलिस, महसूल तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे पथक सकाळपासून युद्धस्तरावर पर्यंत्नरत आहेत. माती व रेतीचा प्रचंड मलबा असल्याने रात्री 7 वाजेपर्यंत मी स्वत: घटनास्थळी हजर होतो. वातावरणात बदल झाला असून वादळ सुटला असल्याने बचाव कार्यात अडसर निर्माण झाला आहे. मात्र बचाव पथक अशास्थितीत युद्धपातळीवर कार्य करीत आहेत.
निलेश होनमोरे, तहसिलदार, सिरोंचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here