


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
गडचिरोली(प्रतिनिधी (
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोलीच्या कार्यालयीन बॅंकेच्या खात्यातील विविध योजनेच्या अनुदानाची 10 लाखाची रक्कम परस्पर नातेवाईकाच्या खात्यात जमा करीत पैशाचे अपहार केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा उपनिबंधकांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. यामुळे प्रशासकीय क्षेत्रात एकच खळबळ निर्माण झाली आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोलीच्या कार्यालयीन बॅंकेच्या खात्यातून जवळपास 10 लाख रुपयाची अफरातफर झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. चौकशीअंती जिल्हा उपनिंबधकांनी रोखवहीमध्ये अनियमितता ठेवल्याचे निदर्शनास आले. यामध्ये अनुदानातील एका योजनेचा निधी 6 लाख रुपये तर दुस-या योजनेचा निधी 4.05 लाख रुपये स्वत:च्या नातेवाईकाच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे उघडकीस आले. यावरुन जिल्हा उपनिंबधकांनी आपल्या कर्तव्यात कसूर करुन पैशाचा अपहार केल्याचे स्पष्ट होत असल्याने आपणावर शिस्तभंगाची कारवाई का करु नये? असा प्रश्न उपस्थित करीत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा उपनिंबधकांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. नोटीस प्राप्त होताच तीन दिवसाच्या आत याबाबत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालय वर्तुळात खळबळ उडाली आहे.



























