आरमोरी तालुक्यात रेती तस्करीचा पर्दाफाश; 1.45 कोटीचा माल जप्त -चार तस्कर जेरबंद

378

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-

आरमोरी (विशेष प्रतिनिधी)
सद्यस्थितीत जिल्हाभरात रेती तस्करी चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्ह्यात अनेक विकासात्मक कामांसह खासगी बांधकामात सर्रास अवैधरित्या रेतीचा वापर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाने रेती तस्करांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने आरमोरी पोलिसांनी सोमवारी, (दि.9) तालुक्यातील देऊळगाव व डोंगरगाव वैनगंगा नदी घाटावरुन होत असलेल्या अवैध रेती तस्करीचा पर्दाफाश करीत चारोपी तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या धडक कारवाईत 1 ट्रक, 2 पोकलॅंड तसेच अवैध रेतीसाठा असा एकूण 1 कोटी 45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरमोरी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरमोरी तालुक्यातील डोंगरसावंगी आणि देऊळगाव येथील वैनगंगा नदीतून बेकायदेशीरपणे उत्खनन करून वाळूची तस्करी केली जात होती. याची गुप्त माहिती आरमोरी पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथकासह डोंगरसावंगी येथील वैनगंगा नदी घाटावर धाड टाकली. यावेळी नदी घाटातून पोकलॅंडच्या सहाय्याने रेतीचे अवैध उत्खनन करण्यासह ट्रकमध्ये रेती भरीत असतांना तिघांना अटक करण्यात आली. ऋषी सीतकुरा राऊत (56) रा. डोंगरसावगी, पोकलॅंड चालक विकेश कुमारवीर चंद्रसिंह (28) रा. मोहाड ता. केडापूर जि. यवतमाळ व ट्रक चालक चालक रुपेश अजित शेख (29) रा. नंफेल ता. जि. वर्धा आदींचा समावेश आहे. या कारवाईत 25 लाख रुपये किंमतीचे ट्रक, 60 लाख रुपये किंमतीचे पोकलॅन, 6 हजार 750 रुपये किंमतीची 10 ब्रास अवैध रेती असा एकूण 85 लाख 6750 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे.

तालुक्यातील डोंगरसावंगी येथील नदी घाटावर धडक मोहिम राबविल्यानंतर आरमोरी पोलिसांनी तालुक्यातीलच देऊळगाव येथील वैनगंगा नदी घाटावर धडक दिली. यावेळी नदीपात्रात पोकलॅंडच्या सहाय्याने रेतीचे अवैध उत्खनन केल्या जात असल्याचे निदर्शनास आले. यात पोकलॅंड चालक मो. तौकीर अब्दूल हसन (24) रा. अहेरतपूर जि. शहाढोल (मध्यप्रदेश) यास अटक करण्यात आली असून या प्रकरणातील शुभम निंबेकर रा. आरमोरी हा आरोपी फरार आहे. यावेळी घटनास्थळावरुन पोलिसांनी 100 ब्रास रेतसाठा अंदाजे किंमत 67 हजार 500 रुपये व 60 लाख रुपये किंमतीची पोकलॅंड मशीन असा एकूण 60 लाख 67 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर दोन्ही कारवाई ठाणेदार कैलास गवते यांच्या नेतृत्वात आरमोरी पोलिस पथकाने पार पाडली. पुढील तपास तसेच आरोपींचा शोध आरमोरी पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here