जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सवाने नवीन सत्राची सुरूवात -विविध उपक्रमांतून होणार नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत

138

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
गडचिरोली(प्रतिनिधी )२२ जून:
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये २३ जून २०२५ पासून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये भव्य प्रवेशोत्सव साजरा होणार असून, सर्व नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत अत्यंत उत्साहात करण्यात येणार आहे.

सदर प्रवेशोत्सव कार्यक्रम सहपालकमंत्री अॅड आशिष जयस्वाल तसेच खासदार, आमदार आणि सनदी अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांमध्ये स्वागतासाठी सज्जता करण्यात आली आहे. शिक्षण विभागातर्फे २१ व २२ जून रोजी शाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून प्रवेशोत्सवासाठी सजावट, फुगे व फुलांनी शाळेची आकर्षक रचना, विद्यार्थ्यांचे स्वागत, सांस्कृतिक कार्यक्रम, पालक शिक्षक संवाद आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, बुट व मोजे शाळेच्या पहिल्याच दिवशी वितरीत करण्याचे निर्देश श्री गाडे यांनी दिले आहेत.

नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण करणे, शिक्षणाविषयी सकारात्मकता वाढवणे आणि शाळेची ओळख करून देणे, हे या प्रवेशोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी शंभर टक्के विद्यार्थी उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठीही विशेष नियोजन करण्यात आले आहे असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here