लीप वर्ष म्हणजे काय? 29 फेब्रुवारी तारीख चार वर्षांनी का येते?

338
Leap day. Concept for date 29 month February.

साभार :बीबीसी मराठी

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :
दर चार वर्षांनी कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29 दिवस आल्याचं तुम्ही पाहिलं असेल. चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात हा 29 वा दिवस कसा येतो हे आपण सोप्या शब्दांमध्ये पाहाणार आहोत. त्यासाठी काही संकल्पना आपण आधी पाहू.

परिवलन आणि परिभ्रमण :

पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला आपण पृथ्वीचं परिवलन म्हणतो. जेव्हा ती स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते त्याला पृथ्वीचं परिभ्रमण असं म्हणतो.पृथ्वीची ही सूर्याभोवतीची फेरी 365 दिवसांमध्ये पूर्ण होते, त्याला आपण एक वर्ष असं म्हणतो. पण खरंतर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365.25 दिवसांचा काळ लागतो. हा अधिकच्या पाव दिवसाचा फरक भरुन काढण्यासाठी प्रत्येक चार वर्षांनी एक अख्खा दिवस वर्षात मिळवला जातो.लीप वर्ष म्हणजे काय?
हा दिवस फेब्रुवारी महिन्यात मिळवला जातो. त्यामुळे या वर्षाला ‘लीप इयर’ असं म्हटलं जातं.

वर्षातील दिवस मोजण्याच्या दोन पद्धती :-
वर्षातील दिवसांची संख्या निश्चित करण्यासाठी दोन प्रकारच्या पद्धती आहेत. त्यामध्ये नाक्षत्र आणि संपातीय वर्षपद्धतीचा समावेश होतो.

सूर्यावरुन पाहिले असता पृथ्वी ज्या नक्षत्रसमुहावर असेल तेथेच ती सूर्याभोवती फेरी मारुन पुन्हा परत येण्यासाठी जो काळ लागतो त्याला नाक्षत्रवर्ष असं म्हटलं जातं. त्या वर्षात 365.2564 दिवस असतात. तर पृथ्वीवरुन पाहिले असता सूर्य एकदा शरद किंवा वसंत संपात बिंदूपाशी आला की पुन्हा त्याच ठिकाणी येण्यासाठी जो काळ लागतो त्याला संपातीय वर्ष असं म्हणतात. या वर्षात 365.2422 दिवस असतात.

लीप वर्ष का येतं? :-

फार प्राचीन काळापासून ऋतू आणि कॅलेंडर यांचा मेळ घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ऋतू आणि कॅलेंडरमधील तारखा यांमध्ये फार अंतर पडू नये यासाठी दरवर्षी पडणारा पाव दिवसांचा फरक लीप वर्षामध्ये भरुन काढला जातो. ज्युलिअस सिझर आणि पोप ग्रेगरी यांनी यासंदर्भात काही बदल सुचवले. त्यापैकी सर्वात आधी ज्युलियस सिझरने कॅलंडरमध्ये बदल सुचवले.

विज्ञानलेखक मोहन आपटे यांनी त्यांच्या ‘मला उत्तर हवंय- खगोलशास्त्र’ या पुस्तकामध्ये ज्युलियस सीझरने सुचवलेल्या सुधारणांबद्दल माहिती दिली आहे.
प्राचीन काळी रोमन साम्राज्यात चांद्रमासावर आधारित कॅलेंडर वापरले जाई. चांद्रमासावर आधारित वर्षात 355 दिवस असतात आणि सौरवर्षात 365 दिवस असतात. त्यामुळे भारतीयांप्रमाणे रोमन साम्राज्यातले लोक हा फरक फरक दर चार वर्षांनी एक महिना वाढवून कॅलेंडर नीट करत.

पण मोठा विस्तार असलेल्या रोमन साम्राज्यात ही व्यवस्था सर्वत्र पाळणे कठीण जाई. धार्मिक नेते किंवा स्थानिक सुभेदार कॅलेंडरचे निर्णय आपापल्या मनाप्रमाणे निर्णय घेत. त्यामुळे ज्युलियस सीझरने इसवीसनपूर्व 46 या वर्षी कॅलेंडर सुधारणेचा हुकुमनामा काढला त्याबाबत अलेक्झांड्रियामधील सॉसिजेनेस या खगोलशास्त्रज्ञाचा सल्लाही घेतला. त्याने सुचवलेल्या सुधारणेनंतर त्या कॅलेंडरला ज्युलियन कॅलेंडर म्हटले जाऊ लागले.

त्याने सुचवलेल्या काही सुधारणा :-

– कालमापन चांद्रवर्षाऐवजी सौरवर्षावर आधारित करावे.
– वर्षभरात 365.25 दिवस असले तरी व्यवहारासाठी प्रत्येक वर्षात 365 दिवस असावेत.
– 0.25 दिवसांचा फरक भरुन काढण्यासाठी दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात 1 दिवस वाढवावा.
– अशाप्रकारे वर्षातील सरासरी दिवसांची संख्या 365.25 झाली.
– 16 व्या शतकापर्यंत ज्युलियन कॅलेंडरमध्ये 12 दिवसांची भर पडली. ख्रिश्चन धार्मिक सण आणि ऋतूचक्रामध्ये फरक पडू लागला. त्यामुळे 16 व्या शतकाच्या उत्तरार्धात पोप ग्रेगरी 13 ने काही सुधारणा केल्या. त्याच्या कॅलेंडरला ग्रेगरिअन कॅलेंडर म्हटलं जातं. त्याने सुचवलेल्या सुधारणा मोहन आपटे यांनी आपल्या पुस्तकात नमूद केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे

– पोप ग्रेगरीने 1582 या वर्षातील ऑक्टोबरमहिन्यातून 12 दिवस वजा केले.
ज्या वर्षाला 4 ने भाग जातो त्याला लीप वर्ष मानले जावे. त्यात 366 दिवस असतील. मात्र 1700, 1800 या शतवर्षांना (सेंच्युरी इयर) लीपवर्ष मानले जाऊ नये. ज्या शतवर्षाला 400 ने भाग जातो ते लीप वर्ष मानले जावे. जसे की 2000, 2400.

(साभार :बीबीसी मराठी )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here