



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :
गडचिरोली(प्रतिनिधी )
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घातपात घडविण्यासाठी तेलंगणाहून गडचिरोलीत दाखल झालेल्या 4 जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. आज, मंगळवार 19 मार्च रोजी पहाटे अहेरी तालुक्यातील कोलामार्का जंगल परिसरात ही चकमक उडाली. यात डीव्हीसीएम व्हर्गिस (28), जि. बीजापूर (छ.ग.) सचिव, मंगी इंद्रावेली क्षेत्र समिती तथा सदस्य, कुमरामभिम मंचेरीयल विभागीय समिती] डीव्हीसीएम पोडीयम पांडु ऊर्फ मंगुलू, (32), रा. कोटराम, भैरमगड जि. बीजापूर (छ.ग.) सचिव, सिरपूर चेन्नूर क्षेत्र समिती, कुरसंग राजू, प्लाटून सदस्य, कुडीमेट्टा व्यंकटेश, प्लाटुन सदस्य हे चार नक्षलवादी ठार झाले. चौघांवर एकूण 36 लाखांचे बक्षीस होते.
प्राप्त माहितीनुसार 18 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास तेलंगणातील नक्षल्यांच्या समितीचे काही सदस्य प्राणहिता नदी ओलांडून अहेरी तालुक्यात प्रवेश केल्याची गुप्त माहिती गडचिरोली पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात अहेरी प्राणहिता पोलीस मुख्यालयातील विशेष नक्षलविरोधी पथक सी 60 च्या जवानांना कोलामार्का जंगलातील छत्तीसगढ सीमेलगत असलेल्या टेकडी परिसरात अभियान राबविण्याची सूचना करण्यात आली. दरम्यान, आज मंगळवारी पहाटे 4 वाजता नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. सी 60 पथकाने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. यात नक्षल चळवळीचे चार वरिष्ठ सदस्य ठार झाले. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याचे बोलल्या जात आहे.

जप्त केलेल्या नक्षली साहित्य 👇

मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त :
चकमकीनंतर सी 60 जवानांनी सदर जंगल परिसरात शोध मोहिम राबविली असता. चार नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. यासोबतच घटनास्थळावरुन 1 एके 47, 1 कार्बाइन आणि 2 देशी बनावटीचे पिस्तूल तसेच इतर स्फोटक साहित्यासह मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे.





























