चकमकीत कमांडर वासूसह दोन महिला नक्षलींचा खात्मा – मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त

987

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :
गडचिरोली(प्रतिनिधी )
छत्तीसगड सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कतरगट्टा जंगल परिसरात सोमवारी, (दि. 13) सकाळच्या सुमारास नक्षल-पोलिसांच्या उडालेल्या भीषण धुम्मचक्रीत एका पुरुषासह दोन महिला नक्षलींना कंठस्नान घालण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. मृतक नक्षलींमध्ये पेरमिली दलमचा प्रभारी व नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचा कमांडर वासू याचा समावेश असून अन्य दोन महिला सदस्यांची ओळख पटलेली नाही. या चकमकीनंतर घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
फेब्रुवारीपासून मे महिन्यापर्यंत नक्षल्यांचा टीसीओसी कालावधी सुरु आहे. या कालावधीत नक्षली चळवळीद्वारे हिंसक घटना घडवून आणण्याचा प्रयत्न केल्या जाते. याच अनुषंगाने पेरमिली दलमचे काही सदस्य छत्तीसगड सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावालगतच्या जंगल परिसरात तळ ठोकून असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. या माहितीन्याच्या आधारे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात विशेष्ज्ञ अभियान पथकाचे अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात सी-60 जवानांच्या दोन तुकड्यांद्वारे सदर जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबविण्यात आले. यादरम्यान दबा धरुन असलेल्या नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने अंधाधूंद गोळीबार सुरु केला. सी-60 जवानांनीही सडेतोड उत्तर दिले. पोलिस-नक्षलींच्या या धुम्मचक्रीत एका पुरुषासह दोन महिला असे तीन नक्षल्यांना ठार करण्यात यश आले. चकमकीनंतर परिसराची झडती घेतली असता मृतक नक्षली पुरुष पेरमिली दलमचा प्रभारी आणि विभागीय समितीचा कमांडर वासू असल्याचे निष्पन्न झाले. तर इतर दोन महिला नक्षलींची उशिरापर्यंत ओळख पटलेली नाही. नक्षली कमांडर वासूच्या मृत्यूने चळवळीला जबर हादरा बसला आहे.

घातपाताचा डाव उधळला –
चकमकीनंतर घटनास्थळाची तपासणी केली असता तीन नक्षल्यांच्या मृतदेहासह मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य आढळून आले. नक्षली साहित्यात तीन स्वयंचलित शस्ते9 एक एके 47, कार्बाइन आणि एक इन्सास असे साहित्य व इतर नक्षली साहित्यांचा समावेश आहे. सदर साहित्य जप्त करण्यात आले असून परिसरात नक्षल विरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here