उघड्यावरील धान जाणार आता गोदामात -गडचिरोली व अहेरी आविमने तया केला प्रस्ताव -22 कोटी रुपये खर्च अपेक्षित

276

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
गडचिरोली (प्रतिनिधी )
धान उत्पादक गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगाम संपल्यानंतर आदिवासी विकास महामंडळ शेतकऱ्यांकडून धान खरेदी करते. परंतु खरेदी केलेला धानाची उचल न झाल्याने सध्या बहुतांश केंद्रावरील धान उघड्यावर पडून आहेत. अवकाळी पावसाचा धोका लक्षात घेता आदिवासी विकास महामंडळाने भाडेतत्त्वावर गोदाम घेण्याचे नियोजन केले आहे. गडचिरोली व अहेरी येथे असलेल्या आविमच्या उपप्रादेशिक कार्यालयानेही या कामाचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव व्यवस्थापकीय संचालक, नाशिक यांना सादर करण्यात आला आहे. भाडे तत्वावर गोदामात धान साठवण्यासाठी अंदाजे 22 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
धान उत्पादक गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगाम संपलयानंतर आदिवासी विकास महामंडळाद्वारा शेतक-यांकडून धान खरेदी करण्यात येतात. जिल्ह्यात यावर्षी खरेदी केलेला एकूण 194 कोटी रुपये किंमतीचा 8 लाख 94 हजार क्विंटल धान ताडपत्रीने झाकून विविध खरेदी केंद्रांच्या आवारात मोकळ्या आकाशाखाली ठेवण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे उघड्यावरील धान भिजल्यास आविमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. हे नुकसान टाळण्यासाठी धानावर ताडपत्री झाकून ठेवण्यात आली आहे. गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत सुरुवातीला 50 केंद्रावर धान खरेदी करण्यात आली. या केंद्रावरील 100 कोटीपेक्षा अधिक रुपयांचे धान ताडपत्री झाकून ठेवण्यात आले आहेत. गडचिरोली कार्यालयांतर्गत 4 लाख 85 हजार क्विंटल धान तर अहेरी कार्यालयांतर्गत 8 लाख 55 हजार क्विंटल धान मोकळ्या आकाशाखाली पडून आहेत. येत्या काही दिवसांत पावसाला सुरुवात होणार आहे. मात्र आजतागायत हे धान उचलण्यात आलेले नाही. त्यामुळेच आता या धानाच्या सुरक्षिततेसाठी आदिवासी विकास महामंडळाने भाडेतत्त्वावर गोदाम घेण्याचे नियोजन केले आहे. या कामासाठी अंदाजे 22 कोटी रुपये लागणार असल्याची माहिती आहे.
मिलर्स असोसिएशनने गिरणी व वाहतुकीचे दर- वाढविण्याची मागणी सरकारकडे केली आहे. सातत्याने वाढणारी महागाई असतानाही मिलिंग व वाहतूक जुन्या दरानुसार होत असल्याने मिलर्सना तोटा सहन करावा लागत आहे. या कारणास्तव मिलर्स असोसिएशनने असहकार आंदोलन सुरू करून खरेदी केंद्रावरून धानाची उचल न करण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनची मागणी शासनस्तरावर अद्याप पूर्ण न झाल्याने आविम आता भाडेतत्वावर गोदाम घेण्याचे नियोजन करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here