


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –

गडचिरोली( प्रतिनिधी )
शिर्डी, शेगाव येथून देवदर्शन करून घराकडे परत येणाऱ्या भाविकांच्या स्कॉर्पिओ चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना 26 मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली. हा अपघात बुलढाणा जिल्ह्यातील आंबेटाकळी ते बोरी अडगाव रस्त्यावर झाला असून यात देवराव रावजी भंडारकर (55) हे जागीच ठार झाले, तर 6 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. सर्वजण कुरखेडा तालुक्यातील आहेत.


मृतक 👆
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि. 24) कुरखेडा तालुक्यातील तळेगाव येथील देवराव रावजी भंडारकर, कांता देवराव भंडारकर, जयश्री राऊत, रोशन कुंबलवार, चेतना रोशन कुंबलवार, मुलगी समृध्दी कुंबलवार, वाहन चालक जयदेव नामदेव नाकाडे हे कुरखेडा येथील लोकेश लांजेवार यांच्या एमएच 33 एसी 2366 क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनाने शिर्डी, शेगाव आदी देवस्थानात देवदर्शन घेण्यासाठी गेले होते. रात्रभर प्रवास करून हे सर्व भाविक 25 मे रोजी शिर्डी आणि आदी देवस्थानांचे दर्शन घेऊन परत येत असताना 26 मे रोजी पहाटेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील आंबेटाकळी ते बोरी अडगाव रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ वाहन पलटी झाले. हा अपघात नेमका कसा घडला याबाबत अजूनही माहिती स्पष्ट नाही. मात्र, चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात देवराव रावजी भंडारकर हे ठार झाले तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना खामगाव येथे उपचारार्थ दाखल केले. खामगाव येथे प्राथमिक उपचारानंतर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. त्यातील तीन वर्षीय समृध्दी रोशन कुंबलवार हिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच तळेगाव आणि कुरखेडा येथील त्यांच्या कुटूंबियांनी अकोलाकडे धाव घेतली आहे. या घटनेने संपूर्ण कुरखेडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.





























