चार लेकींनी दिला आईच्या पार्थिवाला खांदा -पारंपारिक प्रथेला फाटा देत

449

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
बल्लरपूर(प्रतिनिधी)
आम्हाला जगविण्यासाठी आमच्या आईन स्वत:ला झोकून देत काम केले. प्रतिकूल परिस्थितील आम्हाला जगण्याचा संघर्ष शिकविला, त्या आईच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी समाजात कोणती परीक्षा पास करावी लागते का? असा प्रश्न उपस्थित करीत चार बहिणींनी प्रारंपरिक प्रथेला छेद देत आईच्या पार्थिवाला खांदा देत अखेरचा निरोप दिल्याचा भावनिक प्रसंग तालुक्यातील बामणी येथे अनुभवायला आला.
तालुक्यातील बामणी येथील रमाताई शरद बरडे (76) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या अंगणवाडीच्या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. त्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी मनःपूर्वक जोपासली व ते दायित्व मृत्यू समयी पर्यंत निर्धाराने पार पाडले. चारही मुलीच असलेल्या रमाताई बरडे यांच्या चार मुलींनी आईला खांदा देत अखेरचा निरोप देण्याचे निश्चित केले. मनीषा, अभिलाषा, माधुरी, सुनीता या चार बहिणीनी आईला खांदा दिला. या अनुषंगाने चारही बहिणींनी जुन्या रुढी-परंपराना मुठमाती देत नवा क्रांतिकारी विचार समाजात रुजू करण्यासाठी पाऊल उचलले.
रमाताई या सरल फाउंडेशन, पर्यावरण संवर्धन विकास समिती, तसेच मायेची सावली ज्येष्ठ नागरिक संघ बामणीच्या सक्रिय सदस्य होत्या. आईने केलेल्या सेवा कार्याचा प्रभाव मुलीवर होताच तोच वसा घेऊन त्यांच्या मुली सामाजिक कार्य पुढे चालवीत आहेत. या चारही बहिणींना प्रगत विचारांच्या पुरुषांनी पाठिंबात देत त्यांच्या निर्णयाला साथ दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here