घरगुती वादातून पत्नीची गळा चिरून हत्या -सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथील घटना; आरोपी पती फरार

547

सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथील घटना; आरोपी पती फरार

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी )
काही दिवसांपासून सुरु असलेल्या पती-पत्नीमधील घरगुती वादातून पतीने रात्रीच्या सुमारास झोपलेल्या अवस्थेत असलेल्या पत्नीची गळा चिरून हत्या (murder) केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी, (दि.24) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. पद्मा समय्या बोल्ले (35) रा. कोटा पोचमपल्ली असे मृतक पत्नीचे नाव असून आरोपी पती समय्या मुथय्या बोल्ले (40) फरार आहे.
प्राप्त माहितीनुसार सिरोंचा पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या पोचमपल्ली येथील रहिवासी असलेले समय्या बोल्ले व पत्नी पद्मा यांच्या मागील काही दिवसांपासून घरगुती वाद सुरु होता. दरम्यान मंगळवारी, रात्रीच्या सुमारास पत्नी पद्मा झोपलेली असतांना पती समय्या याने अज्ञात धारदार शस्त्राने पत्नी पद्मा हिच्या गळ्यावर वार करुन तिची हत्या केली. पहाटेच्या सुमारास शेजारील व्यक्तींना महिला रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली. याची माहिती तत्काळ सिरोंचा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. आरोपी पती फरार असून सिरोंचा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरु ठेवला आहे. पुढील तपास पोलिस ठाण्याचे ठाणेदार समाधान चव्हाण यांच्या नेतृत्वात सिरोंचा पोलिस करीत आहेत.

चारित्र्याच्या संशयावरुन हत्या?
समय्या बोल्ले याला पत्नी पद्मा हिच्या चारित्र्यावर संशय होता. यातूनच पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडण होत असल्याची चर्चा आहे. या वादातून पती समय्याने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here