महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर गांजा तस्करीचा पर्दाफाश -पातागुडम पोलिसांद्वारे 5 किलो गाजां जप्त; तिघांना अटक

672

T NEWS मराठी नेटवर्क
सिरोंचा (प्रतिनिधी)
जिल्ह्याच्या शेवटचा टोक सिरोंचा तालुक्यातील छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर पातागुडम पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोठी कारवाई करीत गांजा तस्करीचा पर्दाफाश केला आहे़ या कारवाईत ४ ते ५ किलो गांजा जप्त करण्यासह छत्तीसगड राज्यातील तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत़ रवी विश्वकर्मा रा़ बिजापूर, वरुण सोडी रा़ मद्देड व पिशू पुनेम रा़ रानीबोदली तिघेही छत्तीसगड असे अटकेतील आरोपींची नावे आहेत़
प्राप्त माहितीनुसार छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर पातागुडम वन नाक्यावर पातागुडम पोलिसांद्वारे रात्रीच्या सुमारास नाकाबंदी करण्यात आली होती़ या नाकेबंदीदरम्यान रात्री 11.30 वाजताच्या सुमारास जगदलपूर येथून हैदराबाद येथे जात असलेल्या ट्रॅव्हल्स क्र. सीजी १६ सीएस ९०९९ याची तपासणी केली असता ४ ते ५ किलो गांजा आढळून आला़ याप्रकरणी दोन ट्रॅव्हल्सचालक रवि विश्वकर्मा व वरुण सोडी यांचेसह प्रवासी पिशु निमेन यांना अटक करण्यात आली़ तिन्ही आरोपीवंर नार्कोटिक ड्रग्स अँड साइकोट्रॉपिक सब्सटेंस अॅक्ट कलम २२(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती आहे़ सदर कारवाई एसडीपीओ संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनात पातागुडम पोलिसांनी पार पाडली़
गांजा तस्करीत आंतरराज्यीय टोळी सक्रिय?-
जिल्ह्यात दारुबंदी लागू असल्याने जिल्हा पोलिस दल नेहमीच सतर्क असते़ विशेषत: जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून दारुसह मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या भागात पोलिस दल विशेष सतर्क असते़ सिरोंचा तालुक्यातील पातागुडम सीमा भाग इंद्रावती नदीअंतर्गत महाराष्ट्र-छत्तीसगड राज्यांना जोडतो़ त्यामुळे सदर भाग तस्करीच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो़ याच अनुषंगाने पातागुडम पोलिसांनी या नदी पुलावर नाकाबंदी केली होती़ गांजा तस्करीच्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या छत्तीसगड राज्यातील तिन्ही आरोपींचा आंतरराज्यीय गांजा तस्कर टोळीशी संपर्क शक्यता बळावल्याने संबंधित यंत्रणा सतर्क झाली आहे़.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here