


T NEWS मराठी नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी )तालुक्यातील कोटा पोचमपल्ली नाल्यावर उंच पूल उभारण्यात यावा,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजीत पवार गट ) सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी यांनी केली आहे.
पावसाळयाच्या नाल्याला काळात पूर येत असल्याने गावातील नागरिकांचा बाह्य जगाशी संपर्क तुटतो, परिणामी गावकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कोटपोचमपल्ली हे गाव सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय महामार्गालगत असून, सिरोंचा मुख्यालयापासून अवघ्या १० किमी अंतरावर आहे. या गावात मजुरांची संख्या लक्षणीय आहे. दररोज मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या लोकांचे जीवन पावसाळयात अधिकच संकटात सापडते. नाल्यावर पूर

आल्यास शाळकरी मुले, रुग्ण, वयोवृद्ध व महिलांना गावाबाहेर पडणे अशक्य होते. दरवर्षी पावसाळयात कोटापोचमपल्ली नाला ओसंडून वाहतो. या काळात गावकऱ्यांचा संपर्क तुटतो. आरोग्यसेवा, शैक्षणिक सुविधा आणि रोजगाराच्या संधींपासून वंचित राहावे लागते. या परिस्थितीला कायमचा पूर्णविराम देण्यासाठी नाल्यावर उंच पूल उभारणे अत्यावश्यक आहे, असे मधुकर कोल्लुरी यांनी सांगितले. प्रशासन व लोकप्रतिनिधींना लवकरात लवकर याबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. उंच पुलाच्या उभारणीत विलंब झाल्यास गावकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीररूप धारण करू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.



























