आरक्षण उपवर्गीकरणासाठी सिरोंचा तालुक्यातील मादगी बांधवांचे जेलभरो आंदोलन -घोषणाबाजीने तहसिल कार्यालय परिसर दणाणले -तहसिलदारांमार्फत मागण्यांचे निवेदन शासनास सादर

339

T NEWS मराठी नेटवर्क
सिरोंचा (विशेष प्रतिनिधी.)
मादगी समाजबांधवांद्वारे अनुसूचित जातींमधील आरक्षणातील उपवर्गीकरण करण्याची मागणी अधिक जोर धरू लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही राज्य सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे शासन विरोधात आक्रोश व्यक्त करीत समाजबांधवांनी मादगी समाज संघटनेच्या नेतृत्वात शुक्रवारी, (दि.१९) तहसिल कार्यालयावर धडक दिली़ यावेळी शासन विरोधात जोरदार घोषणाजी करीत समाजबांधंवानी तहसिल कार्यालय परिसर दणाणून सोडले़ यानंतर मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना सादर करीत जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले़
राज्य मादगी समाज संघटना, लोकस्वराज्य आंदोलन या सामाजिक संघटनेद्वारे मागील ३० वर्षापासून अनुसूचित जाती प्रवर्गातून लाभ वंचित जात समुहांना उपवर्गीकरण करण्यात यावे यासाठी राज्यभरात विविध आंदोलन, सत्याग्रह, मोर्चा काढण्यात आला़ तसेच सर्वोच्च न्यायालयात विविध संघटनेद्वारे तसेच मादगी समाजबांधवांकडून विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या़ याच अनुषंगाने १ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर अभ्यासपूर्ण निर्णय देत त्या-त्या राज्य शासनाने लाभवंचित जात समुहांना राज्य मंत्रिमंडळातून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे, असे आदेश दिले़ मात्र न्यायालयाच्या निकालानंतर एक वर्षाचा कालावधी लोटूनही राज्य मंत्रिमंडळाने उपवर्गीकरणाचे विधेय मंजूर न केल्याने राज्यभरातील मादगी समाजबांधवांमध्ये शासनाप्रती संताप व्यक्त केल्या जात आहे़ सदर मागणीला घेउुन समाजबांधवांच्या वतीने राज्यभरात जिल्हा, तालुका, शहरात शुक्रवारी जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले़ याच अनुषंगाने सिरोंचा मादगी समाज संघटनेच्या नेतृत्वात संघटनेचे पदाधिकारी, तालुक्यातील हजारो मादगी समाजबांधवांनी शुक्रवारी दुपारच्या सुमारास तहसिल कार्यालयावर धडक दिली़ यावेळी रास्त मागण्याचे निवेदन नायब तहसिलदार पारधी यांचेमार्फत शासनास सादर करीत जेलभरो आंदोलन करण्यात आले़
या आंदोलनात मादगी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष देवय्या येनगंदुला, उपाध्यक्ष वेंकटी दासरी, सचिव समय्या चिलमुला, रंगय्यापल्ली ग्रा़ पं. उपसरपंच बापु अतकुरी , समय्या चिलमुला, गर्कापेठा उपसरपंच वेकंटी दासरी, तेलंगणा राज्यातील मंचेदरियाल मादगी समाज जिल्हाध्यक्ष समय्या चेन्नुरी, राजपाका मल्लेश आदींसह तालुक्यातील हजारो समाज बांधव सहभागी झाले होते़

‘हक्क आमचा;द्यायलाच हवा’-
आंदोलनापुर्वी शहरासह तालुक्यातील हजारो समाजबांधवांनी मादगी समाज संघटनेचे पदाधिका-यांच्या नेतृत्वातील शहरातील मुख्य चौकात गर्दी केली़ त्यानंतर दुपारी १ वाजता तहसिल कार्यालयावर धडक देत शासन विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ यावेळी ‘हक्क आमचा; द्यायलाच हवा’ अशी घोषणांनी तालुका मुख्यालयाचे वातावरण दणाणून सोडले़ आंदोलनादरम्यान समाजात प्रचंड उत्साह आणि निर्धार दिसून आला.

आंदोलन अधिक तीव्र करणार-
संतप्त समाजबांधवांद्वारे मुख्य मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार पारधी यांना सादर करण्यात आले़ या मागण्यांमध्ये प्रामुख्याने आरक्षणातील उपवर्गीकरण तातडीने अमलात आणावे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार समाजाला योग्य हक्क द्यावा, अशी मागणी लावून धरण्यात आली़ तत्काळ याची अंमलबजावणी न झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा समाजबांधवंनी दिला़ या आंदोलनादरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here