नागपूरची धावपटू पीयूषाने पूर्ण केली खरढुंगला मॅरेथॉन – सव्वापाच तासांत गाठले ४२ किलोमीटरचे अंतर

137

 

T NEWS मराठी नेटवर्क-
नागपूर (प्रतिनिधी)
नागपुरची धावपटू पीयूषा अरुणा सबाने हिने दुसऱ्यांदा लद्दाखमधील खरढुंगला इंटरनॅशनल मॅरेथॉन पूर्ण केली. अत्यंत कठीण अशा वातावरणात ११ हजार १५० फूट उंचीवर अत्यंत कठीण वातावरणात ४२ वर्षीय पीयूषाने ही कामगिरी केली आहे.

यंदा या मॅरेथॉनमध्ये जगभरातून सहा हजारांपेक्षा अधिक धावपटू सहभागी झाले होते. यात १२५ मुलींचा समावेश होता. यात पीयूषाने अकरावा क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत स्पर्धकांना ४२ किलोमीटरचे अंतर सहा तासांत पूर्ण करावे लागते. मात्र, पीयूषाने हे अंतर सव्वापाच तासात पूर्ण केले.
दुबईतील एका नामवंत कंपनीत उच्चपदावर कार्यरत असलेल्या पीयूषाने ही स्पर्धा पूर्ण केल्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या ७२ किलोमीटरच्या स्पर्धेसाठी ती पात्र ठरली आहे. शारीरिक क्षमतेचा कस लावणाऱ्या या स्पर्धेत धावताना तिची प्रचंड दमछाक झाली. शूजमधील बोटे एकमेकांना घासल्यामुळे पायाला दुखापत झाली. पायाला जखमा, पोटात क्रॅम्प आणि श्वास घेण्यास त्रास होत असताना न डगमगता तिने धावणे सुरूच ठेवले. यादरम्यान प्रशिक्षक मारुती यांनी तिला सतत प्रोत्साहन दिले.

आता ‘सेव्ह वुमन’ हा संदेश देण्यासाठी दीक्षाभूमी ते सेवाग्राम येथील बापू कुटी हे ७५ किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्याचा निर्धार पीयूषाने केला आहे. पीयूषा ही सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ लेखिका अरुणा सबाने यांची कन्या आहे.
(साभार – दैनिक महाराष्ट्र टाइम्स )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here