बुर्गी येथील पोस्ट ऑफिस स्थलांतरास ग्रामस्थांचा तीव्र विरोध -आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन सादर

574

T NEWS मराठी नेटवर्क
एटापल्ली (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजा- बुर्गी येथे गेल्या ६५ ते ७० वर्षांपासून कार्यरत असलेल्या पोस्ट ऑफिसचे चंदनवेली येथे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव डाक विभागाने मांडल्याने बुर्गी गावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत बुर्गीच्या वतीने अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. धर्मरावबाबा आत्राम यांना पोस्ट ऑफिसचे स्थलांतर रद्द करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
बुर्गी गावाची लोकसंख्या सुमारे ३४६५ इतकी असून ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, भगवंतराव माध्यमिक आश्रमशाळा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना तसेच पोलीस मदत केंद्र (येमली) यांसारखी महत्त्वाची शासकीय कार्यालये गावात कार्यरत आहेत. या सर्व कार्यालयांचा शासकीय पत्रव्यवहार पोस्ट ऑफिसमार्फतच केला जातो.
विशेष म्हणजे भगवंतराव माध्यमिक आश्रमशाळा बुर्गी येथे इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचे केंद्र असून परीक्षेसंबंधित गोपनीय साहित्य डाक विभागामार्फतच उपलब्ध करून दिले जाते. तसेच पोस्ट ऑफिसमार्फत नागरिकांना स्पीड पोस्ट, रोख व्यवहार, सुकन्या समृद्धी योजना, आरडी, पीएलआय, अपघात विमा, पीएम किसान व घरकुल योजनेसाठी IPPB खाते, केवायसी, क्यूआर कोड आदी विविध सेवा दिल्या जातात.
बुर्गी हा अतिदुर्गम आदिवासी भाग असून पोस्ट ऑफिस हेच ग्रामीण जनतेसाठी शासनाच्या विविध योजनांशी जोडणारे महत्त्वाचे माध्यम आहे. पोस्ट ऑफिसचे स्थलांतर झाल्यास ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.
निवेदन देताना यावेळी एटापल्ली तालुका अध्यक्ष संभा हिचामी, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडूके, लक्ष्मण नरोटे, विनोद हिचामी (बुर्गी), सुगत उराडे, राजूभाऊ नरोटे, अनिलभाऊ करमरकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार मा. धर्मरावबाबा आत्राम यांनी विषय गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here