दीना नदीत कार कोसळून दोघे ठार, तिघे जखमी -अंत्यविधी आटोपून घरी जाताना भीषण अपघात

1133

T NEWS मराठी नेटवर्क
गडचिरोली (प्रतिनिधी)
नागेपल्ली येथील रवींद्र तंगडपल्लीवार यांच्या अंत्यविधीनंतर चारचाकी वाहनाने घरी परत जात असताना नातेवाईकांची कार नदीत कोसळल्याने एकाच कुटुंबातील दोघे ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना आज, २० जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास खमनचेरु आणि बोरी दरम्यान घडली.
या अपघातात यादव विठ्ठलराव कोलपाकवार (७३) रा़ आष्टी, सुनील मुरलीधर कोलपाकवार (५५) रा़ बोरी हे ठार झाले तर अभिजीत यादव कोलपाकवार (४०) रा़ आष्टी, अर्चना यादव कोलपाकवार रा़ आष्टी व पद्मा सत्यनारायण कोलपाकवार रा़ बोरी हे गंभीर जखमी झाले आहेत़ प्राप्त माहितीनुसार, नागेपल्ली येथील रवींद्र तंगडपल्लीवार यांचा १९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास आलापल्लीच्या जंगलात मतृदेह आढळून आला होता़ पोलिसांनी पंचनामा करून सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांना मृतदेह सोपविला़ आज, २० जानेवारी रोजी रवींद्र तंगडपल्लीवार यांची नागेपल्ली येथे अंत्यविधी करण्यात आला़ या अंत्यविधीसाठी विविध गावातील नातेवाईकांनी हजेरी लावली होती़ यादव विठ्ठल कोलपाकवार, पत्नी अर्चना यादव कोलपाकवार, मुलगा अभिजित यादव कोलपाकवार, सुनील मुरलीधर कोलपाकवार, पद्मा सत्यनारायण कोलपाकवार हे सुद्धा अंत्यविधी आटोपून आपल्या एमएच ३३ व्ही ८२४९ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने आष्टीकडे निघाले होते़ दरम्यान, खमनचेरु नंतर असलेल्या दिना नदीच्या पुलावरून सदर वाहन नदीपात्रात कोसळल्याने वाहनातील कोलपाकवार कुटुंबातील सर्वच जण गंभीर जखमी झाले़ लगेच त्यांना उपचारार्थ अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचारादरम्यान यादव कोलपाकवार आणि सुनील कोलपाकवार यांचा मृत्यू झाला़ तर यादव कोलपाकवार यांची पत्नी अर्चना व मुलगा अभिजीत तसेच पद्मा कोलपाकवार हे गंभीर जखमी असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here