– गुरुदत्त वसंत सोनसूरकरदु निया माने बुरा तो गोली मारो

183

 

T NEWS मराठी नेटवर्क-
भारतीय प्रेक्षकांना आवडेल अश्या भावनांच्या, नात्यांच्या, जबाबदारीच्या, उसुल आणि बदल्याच्या ठासून भरलेल्या पण तितक्याच खऱ्या वाटणाऱ्या कथा लिहिणारे सलीम जावेद. ही एक संस्था आहे माझ्यासारख्या अनेक लोकांसाठी. पिटातला आणि सुटातला दोन्ही प्रेक्षक काबीज करण्याची भन्नाट कला आणि more over तुफान बुद्धिमत्ता असणारे जावेद साब….

दिवार मध्ये शशी कपूर ला कळतं की आपला भाऊ अमिताभ सुद्धा एक नामचीन डॉन आहे आणि त्याला पकडणं हे आपल्या शिरावर येऊन पडणार आहे. तो द्विधा मनस्थितीत असतो. त्याला एक मुलगा काहीतरी चोरून पळताना दिसतो. लोक त्याच्या मागे चोर चोर म्हणून लागलेत. शशी इन्स्पेक्टर आहे, तो धावत त्या मुलाचा पाठलाग करतो आणि नाईलाजाने त्या मुलाच्या पायावर गोळी झाडतो. बघतो तर काय, त्या मुलाने चोरले असतात पाव… भूक ही काय गोष्ट आहे हे लहानपणापासून बघितलेल्या शशीचं हृदय द्रवतं. तो त्या मुलाचा पत्ता शोधत त्याच्या घरी जातो. म्हातारा आंधळा मास्तर बाप आणि म्हातारी आई असलेलं कुटुंब पाहून तो अजूनच अपराधी भावनेने ग्रासून त्यांना काही पैसे देतो व स्वतःची ओळख देतो. त्याने त्या वृद्ध जोडप्याच्या मुलावर गोळी झाडलीय हे ही सांगतो… ती म्हातारी शशीला शिव्या शाप देऊ लागते पण बाप ए के हंगल मात्र म्हणतो, मान्य आहे आम्ही गरीब आहोत परिस्थितीने पिचले आहोत पण मग सगळं जगच चोर बनलं तर कसं चालेल? हा प्रसंग. हा प्रसंग शशीला मानसिक दृष्ट्या कणखर बनवतो. अमिताभने आपल्या कुटुंबासाठी म्हणून जरी काळे धंदे केले तरी ते चूकच हे लॉजिक शशी आणि प्रेक्षक यांच्या डोक्यात एकदम फिट बसतं आणि अमिताभला सहानुभूती मिळूनही शशी व्हीलन होत नाही..

हा प्रसंग सलीम जावेद यांच्या हुशारीने लिहिलेल्या कथा पटकथेचं उत्तम उदाहरण तर आहेच पण त्यांचा भारतीय साहित्य, लोक कथा, पुराण कथा याचा अभ्यासही दाखवतं. वरचा प्रसंग हा रामायणातील दशरथ राजा व श्रावण बाळाचे आई वडील यांच्या संभाषणावरून घेतलाय. जावेदसाब असोत की सलीमसाब, भगवद्गीतेतले श्लोक, रामायण, महाभारत किंवा अरेबिक, पाश्चात्य संस्कृतीतल्या कथा याची चटचट उदाहरणं त्यांच्या तोंडावर असतात. विभक्त होऊन जावेदसाबनी गीतकार, शायर म्हणून सुद्धा काम केलं.

स्वतंत्र पणे केलेल्या कामांमध्ये जावेदसाबचा अर्जुन मला कालातीत वाटतो. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात तरुणाईचा होणारा आपल्या स्वार्थासाठी वापर अशी theme असणारा अर्जुन, इथल्या म्हणजे मुंबईच्या एका सर्वसामान्य मराठी मुलाचा चेहरा, नाव, आडनाव घेऊन आला आणि अर्जुन ने वास्तववादी व व्यावसायिक सिनेमाचा सुवर्णमध्य साधला होता.

जावेद साब यांचा मेहुणा म्हणजे प्रख्यात cinematographer बाबा आझमी म्हणतात, जावेद साब ने जर राजकीय पार्श्वभूमीवर लिहिलं तर ती एक उत्तम फिल्म बनेल. अगदी खरं आहे कारण जावेद साहेबांची राजकीय सामाजिक समज पक्की आहे आणि त्यात त्यांचा बंड स्वभाव…

ठीक हैं समंदर हमारी जागीर नहीं हैं, लेकिन उसकी लहरोंपर तुम्हारी कंपनी का ठप्पा भी नहीं लगा हैं… हा सागर मधला राजाचा संवाद या otherwise lame lovestory ला एका लेखकाच्या अनुषंगाने काहीतरी dimension देण्याचा प्रयत्न दिसतो.

प्रखर बुद्धिमत्ता आणि तेवढीच प्रखर सामाजिक बांधिलकी असणारा हा नास्तिक माणूस (नास्तिक असूनही हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन श्रद्धांचा सिनेमात मान ठेवून अनेक हिट संवाद लिहिणारा ‘आज खुश तो बहोत होंगे तुम’, मन से रावण जो निकाले राम उनके मन में हैं…) भारतीय सिनेममधला एक ट्रेंड सेंटर आहे. त्यांच्या कामाचा गोषवारा किंवा यादी देणं फारच juvenile ठरेल… मी स्वतः ज्याच्याकडे बघून अनेक गोष्टी शिकलो असा हा ग्रंथ आहे…

जाँ निसार अख्तर वडील आणि झोया, फरहान सारखी गुणी फिल्म मेकर मुलं असलेला हा माणूस आज ८१व्या वर्षात पदार्पण करतोय हे खरंच वाटत नाही… गौतम राजाध्यक्ष यांनी जावेदसाब बद्दल लिहिलं होतं, “जादू (जावेदसाबचं घरातलं नाव) चे फोटो काढताना मला त्याचं सगळ्यात आवडलेलं फिचर म्हणजे त्याचे डोळे.. सुई सारखे तीक्ष्ण. त्याच्या प्रगल्भ आणि सतर्क बुद्धीचे निर्देशक असणारे त्याचे धारदार डोळे…” जावेदसाबचे फक्त डोळेच नाहीत तर जुबाँ पण धारदार आहे हे आपण हल्ली नेहमी पाहत असतोच.

पण माणूस मिश्किल सुद्धा तेवढाच आहे. मागच्या वर्षी आर डी च्या एका कार्यक्रमाला त्यांना पुष्पगुच्छ देण्याची आयोजकांची घाई पाहून ते म्हणाले, “सरकारने माझं बाकी काही ऐकलं नाही तरी एक मात्र जरूर ऐकावं. एक कायदा काढून हे बुके देणं बंद करावं.” अशा या प्रचंड प्रतिभावंत लेखक कवी साहित्यिकाला जनमदिन की ढेर सारी बधाइयाँ (विदाऊट बुके) बरं का…

साभार -मीडिया वाच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here