



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
गडचिरोली (प्रतिनिधी )
मागील काही वर्षापासून जिल्ह्यात हिंस्र प्राण्याची संख्या झपाट्याने वाढली आहे. जिल्ह्यातील घनदाट जंगलात वाघ, बिबट्या, अस्वलासह या हिंस्र प्राण्यांसह रानटी हत्तींचाही मुक्त संचार कायम आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तेंदूपत्ता हंगामाला सुरुवात झाली आहे. सर्वाधिक रोजगार देणारा हंगाम म्हणून तेंदूपत्याकडे बघितले जाते. अशातच मंगळवारी, (दि. 14) सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील सावरगाव जंगल परिसरात तेंदूपाने तोडणा-या महिलेवर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना घडली. पार्वताबाई बालाजी पाल (65) रा. आंबेशिवणी असे मृतक महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे तेंदूपत्ता मजूरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसात जिल्ह्यातील घनदाट जंगलात हिंस्र प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे तेंदूपत्ता संकलन जिवावर बेततांना दिसत आहे. यामुळे तेंदूपत्ता मजूरामंध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून याचा फटका तेंदूपत्ता संकलनाला बसण्याची चिन्हे बळावली आहेत.
जिल्ह्यातील दुर्गम, ग्रामीण क्षेत्रात सद्यस्थितीत तेंदू संकलनाचे काम जोमाने सुरु आहे. कोट्यवधी उलाढाल होणा-या या हंगामातून जिल्ह्यातील मजूरवर्गाला मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होत असतो. त्यामुळे स्थानिक मजूरांसह जिल्ह्याबाहेरील मजूरही तेंदूपत्ता संकलनात व्यस्त आहेत. मात्र तेंदूपत्ता संकलनादरम्यान जिल्ह्यातील घनदाट जंगलात हिंस्र प्राण्यांचा धोका कायम आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी तेंदूपत्ता संकलनादरम्यान हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात मजूर जखमी झाल्याच्या घटना घडून आल्या आहेत. रविवारी, (दि. 12) अहेरी तालुक्यातील व्यंकटरावपेठा जंगल परिसरात रानटी डुकराने तेंदूपत्ता संकलन करणा-या अनुसया भोयर या महिलेवर हल्ला चढवित गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असतांनाच मंगळवारी, (दि. 14) आंबेशिवणी येथील पार्वताबाई पाल ही वृद्ध महिला इतर तीन महिलांसोबत कठाणी नदी ओलांडून चातगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या सावरगावच्या जंगलात गेली असता सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरुन असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवित त्यांना फरफटत जंगलाच्या दिशेने घेऊन गेला. जवळच्या महिलांनी आरडाओरड केली असता परिसरात तेंदूपाने तोडणारे इतर मजूर गोळा झाले. त्यांनी वाघाला पिटाळून लावले. मात्र, तोपर्यंत पार्वताबाई गतप्राण झाल्या. घटनेची माहिती प्राप्त होताच वनविभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

हत्तीनंतर आता वाघही परतले…
मागील काही वर्षात जिल्ह्यातील घनदाट जंगलात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून या वाघांच्या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. मात्र मागील काही महिन्यांपासून वाघाच्या हल्ल्याची घटना घडून न आल्याने नागरिकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला होता. असे असले तरी दुसरीकडे मात्र जिल्ह्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ कायम असल्याने जंगल परिसरातील नागरिकांमध्ये दहशत कायम आहे. अशातच ऐन तेंदूपत्ता हंगामात वाघाने महिलेवर हल्ला चढवून ठार केल्याची हंगामातील पहिली घटना घडल्याने हत्तींपाठोपाठ आता वाघही परतल्याने जंगलात कसे वावरावे? तेंदूपत्त संकलन करावे की नाही? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.





























