सिरोंचा बसस्थानकात प्रवाशांना उन्हाचे चटके -कंत्राटदाराद्वारे बांधकामात संथ गती कायम -एसटी प्रशासनाचीही डोळेझाक

108

तिरुपती चिट्याला
गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा –
जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या सिरोंचा तालुका मुख्यालयातील बसस्थानकाचे काम चार वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पुन्हा सुरु झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा सुस्कारा सोडला होता. मात्र बसस्थानक बांधकामाच्या संथ गतीमुळे तसेच संबंधित प्रशासनाद्वारे पर्यायी व्यवस्था करण्यात न आल्याने भर ऊन्हाळ्यात प्रवाशांना बसस्थानकात ऊन्हाचे चटके खात बसची प्रतिक्षा करावी लागत आहे. प्रवाशांच्या या गैरसोयीकडे रापम प्रशासनाने कानाडोळा केला असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सिरोंचा हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असून गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती या तीन नदी तिरावर वसले आहे. पुलाच्या बांधकामामुळे सिरोंचा हे तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड या तीन राज्यांसाठी महत्वाचे ठिकाण ठरले आहेत. त्यामुळे तेलंगणा राज्यातूनही मोठ्या प्रमाणात बसेस येत असल्याने सिरोंचा येथे प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. याशिवाय जिल्ह्यातील अनेक भाविक व पर्यटक कालेश्वर मंदिर, मेडिगड्डा धरण, वडधम येथे पार्क पाहण्यासाठी येत असतात. त्यामुळे सिरोंचा येथे सोयीसुविधायुक्त सुसज्ज बसस्थानक व्हावे, अशी मागणी अनेक वर्षापासून जनतेकडून होत होती. याअंतर्गत शासनाने सिरोंचा येथे सुसज्ज बसस्थानक उभारणीसाठी 5 कोटीचा निधीही मंजूर केला. या निधीअंतर्गत संबंधित कंत्राटदाराद्वारे कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र त्यानंतरचा निधी प्राप्त न झाल्याने संबंधित कंत्राटदाराने काम बंद पाडले होते. अखेर चार वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पुन्हा या बसस्थानकाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराद्वारे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याने अद्यापही सुसज्ज बसस्थानकाचे स्वप्न अधुरेच आहे. एकीकडे बसस्थानकाचे काम सुरु असतांना महामंडळ प्रशासनाने एसटी बससाठी तसेच प्रवाशांसाठी पर्यायी सोय करणे आवश्यक होते. मात्र याकडे कमालीचे दुर्लक्ष करण्यात आल्याने भर ऊन्हात बसस्थानकाच्या खुल्या पटांगणात उष्णतेचे चटके सहन करीत प्रवासी बसची प्रतिक्षा करतांना दिसून येत आहेत. प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असतांना प्रशासन मुंग गिळून असल्याने एसटी महामंडळ प्रशासनाप्रती प्रवाशांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे.

प्रसाधनगृह सोडाच साधे पाण्याचीही व्यवस्था नाही:
ऊन्हाळ्याचे दिवस सुरु असून मे महिन्यात ऊन्हाचे चटके असह्य होत आहेत. अशा परिस्थितीत अनेक प्रवासी एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी प्रवास करीत आहेत. मात्र सिरोंचा स्थित बसस्थानकामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी प्रसाधनगृहाची कोणतीच व्यवस्था नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. ऊन्हाळ्याच्या कालावधीत पाण्यासाठी कंठ अधिकच दाटून येतो, अशा अवस्थेत एसटी प्रशासनाद्वारे बसस्थानकात प्रवाशांसाठी थंड पाण्याची सोय करणे आवश्यक होते. मात्र याकडेही कमालीचे कानाडोळा करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here