सिरोंचात कोनसरीच्या धर्तीवर उद्योग उभारा -तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मागणी -स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेष प्रयत्न करण्याची गरज

236

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा (प्रतिनिधी)
जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या व घनदाट जंगलासह खनिज संपत्तीने भरभरुन दिलेल्या सिरोंचा निर्वाचन क्षेत्रात सुरजागड लोह प्रकल्पासारखा एखादा मोठा प्रकल्प उभारला गेल्यास या भागातील नागरिकांना स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होऊन रोजगारासाठीची भटकंती दूर होऊ शकते. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष केंद्रित करुन उद्योग उभारणीसाठी विशेष प्रयत्न करावे, अशी मागणी सिरोंचा तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.
पूर्वी निर्वाचन क्षेत्र म्हणून सिरोंचा विभागाची ओळख होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अहेरी निर्वाचन क्षेत्राची निर्मिती करण्यात आली. अहेरी क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या एटापल्ली तालुक्यात नुकताच सुरजागड लोहप्रकल्प उभारण्यात आला. यामुळे या भागातील बेरोजगार युवकांना लाभ झाला असला तरी सिरोंचा तालुक्यातील सुशिक्षितांना याचा कोणताच लाभ मिळालेला नाही. या क्षेत्रातील सर्वात जुना व महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्याच्या विकासाकडे शासनाने नेहमीच दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे. या तालुक्यात कोणतेही उद्योगधंदे नसल्याने येथील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी तेलंगणा व छत्तीसगड राज्यात धाव घ्यावी लागत आहे. रोजगाराअभावी सातत्याने सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत वाढत होत आहे.
अहेरी निर्वाचन क्षेत्रात काही वर्षापूर्वी सूरजागड लोह प्रकल्प उभारण्यात आले. तसेच चामोर्शी तालुक्यातही कोनसरी येथेही उद्योग उभारण्यात आल्याने या परिसरातील युवकांना तसेच स्थानिकांना रोजगार प्राप्त झाला आहे. याच धर्तीवर सुरजागड, कोनसरी प्रकल्पाप्रमाणेच सिरोंचा तालुक्यात सुद्धा एखादा उद्योग सुरु करण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील युवकांकडून होत आहे. या उद्योग उभारणीतून येथील सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन पर्यायाने सिरोंचा तालुक्याचाही औद्योगिक विकास करणे शक्यत होईल.

लोकप्रतिनिधींनी शासनाचे लक्ष वेधण्याची गरज –
सिरोंचा तालुक्याला ऐतिहासिक असा वारसा लाभला आहे. या परिसरात घनदाट जंगल वसलेले असून येथेही मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. त्यामुळे या खनिज संपत्तीच्या माध्यमातून सुरजागडसारखा छोटासा उद्योग उभारला गेल्यास येथील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम उपलब्ध होऊ शकते. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पाचा या परिसरातील विकासास हातभार लागला आहे. त्यामुळे या प्रकल्पांतर्गत एखादा उद्योग सिरोंचा तालुक्यात उभारला गेल्यास सिरोंचा तालुक्याचा विकास साध्य होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासाठी विशेष प्रयत्न करीत शासनाचे लक्ष वेधण्याची गरज व्यक्त होत आहे.

सुशिक्षितांची रोजगारासाठी परराज्यात धाव –
ब्रिटिशकाळात सिरोंचा परिसरातील मोठे वैभव होते. मात्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या भागाकडे शासन, प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केल्याने या भागाचा मागील 40 वर्षाच्या कालावधीत पाहिजे त्या प्रमाणात विकास होऊ शकला नाही. सिरोंचा तालुक्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता येथे उद्योगाला वाव आहे. असे असतांनाही केवळ उद्योगधंद्याअभावी तालुक्यातील सुशिक्षित युवक रोजगारासाठी वणवण भटकतांना दिसत आहे. कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी या भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक शेजारच्या तेलंगणा, छत्तीसगड राज्यात धाव घेतांना दिसून येत आहे. त्यामुळे सुरजागड प्रकल्पाच्या धर्तीवर येथे या प्रकल्पांतर्गत उद्योग उभारण्याची मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here