



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :
सिरोंचा (प्रतिनिधी )
जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा-आसरअलली राष्ट्रीय महामार्गावरील वडध-तुमन गाव परिसरातील जंगलात परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत आहे. या महामार्गावरुन प्रवास करणा-या अनेक नागरिकांना सदर बिबट्याचे दर्शन घडून आल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
सिरोंचा-आसरपल्ली राष्ट्रीय महामार्गावरील वडधम ते तुमनूर या गावालगतच्या जंगल परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर सुरु आहे. तीन दिवसांपूर्वी सिरोंचा येथील काही युवक आसरअल्ली-सिरोंचा मार्गे मध्यरात्रीच्या सुमारास प्रवास करीत असतांना थेट रस्त्याच्या कडेने बिबट जात असल्याचे निदर्शनास आले. बिबट्याचे दर्शन घडून आल्याने सदर युवकांची बोबडीच वळली. यातील काही युवकांनी बिबट्याचे छायाचित्र कॅम-यात कैद करुन समाजमाध्यमावर व्हायरल केले आहे. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे या मार्गावरुन ये-जा करणा-या वाहनधारकांसह जंगल परिसरालगत असलेल्या ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाने सदर जंगल परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे मान्य केले असून रात्रीच्या सुमारास या परिसरात प्रवास वा संचार करु नये, असे आवाहन वनिभागाच्या वतीने करण्यात आले आहे.






























