महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर पोलिस-नक्षल धुम्मचक्री -मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त

470

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
गडचिरोली(प्रतिनिधी )
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षल विरोधी अभियान राबविले जात असतांना पोलिस-नक्षल्यांमध्ये चकमक उडाल्याची घटना बुधवारी, (5 जून) सकाळच्या सुमारास देचलीपेठा पोलिस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या ग्यारेवाडा गावालगतच्या इंद्रावती नदी काठावर घडली. या चकमकीनंतर घटनास्थळावर शोध मोहिम राबविली असतांना मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले.
अहेरी एलओएसचे काही सशस्त्र कार्यकर्ते तेंदूपत्ता कंत्राटदारांची बैठक बोलावून त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी उद्देशाने गडचिरोलीत दाखल झाल्याची खात्रीशीर माहिती जिल्हा पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे अहेरीचे अतिरीक्त पोलिस अधीक्षक एम. रमेश याच्या नेतृत्वात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील इंद्रावती नदी काठालगतच्या परिसरात सी 60 जवानांच्या पथकाद्वारे नक्षल विरोधी अभियान राबविण्यात आले. बुधवारी सकाळच्या सुमारास देचलीपेठा पोलिस मदत केंद्राअंतर्गत ग्यारेवाडा गावाजवळील इंद्रावती नदी काठ परिसरात शोध मोहिम राबवित असतांना नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अंधाधूंद गोळीबार सुरु केला. जवानांनीही नक्षल्यांना चोख प्रतिउत्तर दिले. पोलिस जवानांचा वाढता दबाव लक्षात घेत नक्षली घनदाट जंगलातून पसार झाले. यावेळी घटनास्थळाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य आढळून आले. सदर परिसरात नक्षल विरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले.

नक्षली साहित्यांमध्ये यांचा समावेश –
चकमकीनंतर पोलिस जवानांनी सदर परिसरात शोध मोहिम राबविली असता घटनास्थळावरुन स्फोटके, वायर, बॅटरी, काही पिट्टू, जीवनापयोगी सामानासह मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here