तेलंगणातून विद्यूत पुरवठा तसेच बीएसएनएल सेवा कनेक्ट करा -तालुका कॉंग्रेस कमेटीची निवेदनातून मागणी

223

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा (प्रतिनिधी )
तालुक्यात एकमेकांशी संपर्क साधण्याचे एकमेव साधन असलेली बीएसएनएल कुचकामी ठरत आहे. यामुळे भ्रमणध्वनीधारकांना मनस्ताप सहन करावा लागत असून नेटवर्कअभावी शासकीय, निमशासकीय तसेच ऑनलाईन कामे करतांना अडचणी येत आहे. यासोबत वारंवार वीज सेवा खंडित होत असल्याने तालुकावासीयांना अंधारात वावरावे लागत आहे. ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी शेजारच्या तेलंगणा राज्यातून बीएसएनएलसह विद्यूत सेवा कनेक्ट करुन तालुकावासीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अतिसंवेदनशील, अतिदुर्गम व मूलभूत सुविधेपासुन वंचित असलेल्या सिरोंचा तालुका आहे. येथे एकमेकांना संपर्क साधण्याचे एकमेव साधन असलेली बीएसएनएल सेवा कुचकामी ठरत आहे. शासकीय व निमशासकीय तसेच बँकिंग सेवा इतर ऑनलाईन कामे नेटवर्कने जोडली असतांना इंटरनेट सेवेच्या गंभीर समस्येमुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यात इतर कोणतीही खाजगी सेवा उपलब्ध नसल्याने नागरीकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तसेच तालुकास्थळ सिरोंचासह ग्रामीण, दुर्गम क्षेत्रात वीज खंडितचा प्रकार सातत्याने घडत असल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे सदर गंभीर समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. शेजारच्या तेलंगाणा राज्यातील किष्टमपेटा ते सिरोंचापर्यंत प्रलंबित असलेले 132 केव्ही टॉवर लाईनद्वारे विद्युत पुरवठ्याची नितांत गरज आहे. तसेच तेलंगाणातील कोल्लुर जवळील चार टॉवर लाईनचे कामही रखडले आहे. सदर टॉवर उभारणी करुन विद्यूतसह तेलंगणा राज्यातून बीएसएनएलची सेवा कनेक्ट केल्यास येथील समस्या सुटू शकते. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रीत करुन त्वरीत सदर कामे पूर्ण करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश जवाजी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने तहसिलदार यांचेमार्फतीने जिल्हाधिका-यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here