विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे अहेरीत जंगी स्वागत

525

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
अहेरी(प्रतिनिधी )शनिवार, 22 जून रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास माजी कॅबिनेट मंत्री तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नवनिवार्चित खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. ना. विजय वडेट्टीवार व खासदार डॉ. किरसान यांचे अहेरी नगरीत आगमन होतच गावकरी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत केले. तसेच गडचिरोली लोकसभा निवडणूक विजयोत्सव रॅली काढली. यावेळी ना. वडेट्टीवार आणि खासदार डॉ. किरसान यांनी विविध विभागाची आढावा बैठक घेतली. अहेरी तालुक्यातील रस्त्यांची बकाल अवस्था, महसूल विभागाच्या अटी व शर्तींना न जुमानता होणारे अवैध उत्खनन, वनविभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या ठिकाणी होणारी अवैध कामे अशा अनेक समस्यांनी ग्रस्त मागास अहेरीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून सुद्धा अहेरीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले.
गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणुकीत डॉ. नामदेव किरसान यांनी भाजपाचे उमेदवार नेतेंचा जवळपास 1 लाख 40 हजार मतांनी पराभव केला. त्याबद्दल अहेरी येथील गांधी चौकात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि नवनिवार्चित खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आविसं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व माजी जिप अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. गडचिरोली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय हा कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाने झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता स्वतःची निवडणूक म्हणून लढला आणि जिंकला, असे गौरवोद्गार वडेट्टीवार यांनी काढले. कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here