


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
गडचिरोली(जिल्हा प्रतिनिधी )
जिल्ह्याचा दक्षिण क्षेत्रातील अहेरी उपविभागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सलग पावसामुळे या भागातील नद्या-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अहेरी उपविभागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या सिरोंचात ढगफुटी सदृश्य स्थिती निर्माण होऊन मागील 24 तासात तब्बल 183 मिमी पाऊस कोसळला. या मुसळधारामुळे रात्रीच्या सुमारास मुख्यालयातील वसतिगृहात पाणी घुसल्याने अडकून पडलेल्या 75 विद्यार्थ्यांचे तत्काळ रेस्क्यू करण्यात आले.
जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याचा टोक असलेल्या सिरोंचा तालुक्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधारा सुरु आहेत. मागील 24 तासात तालुक्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून सिरोंचा महसूल मंडळात तब्बल 270.8 मिमी एवढा पाऊस कोसळला आहे. अशातच गुरुवारी रात्रीच्या सुमारास सिरोंचा मुख्यालयी असलेल्या सुभाषचंद्र बोस वसतिगृहात पाणी घुसल्याने विद्यार्थी प्रचंड घाबरून गेले. तत्काळ स्थानिक पोलिस जवानांनी विशेष मोहिम राबवित वसतिगृहात प्रवेश केला. यावेळी विद्यूत पुरवठाही खंडित झाल्याने अडचणी येत होत्या, यातही जवानांनी टार्चच्या सहाय्याने कमरेभर पाण्यातून सर्व 75 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले. सदर मोहिम फत्ते करण्याकरिता सिरोंचा उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक समाधान चव्हाण, पोलिस हवालदार राकेश नागुला, प्रविण तोर्रेम, दिलीप उईके, राकेश करमे, नईक शेख आदींनी परिश्रम घेतले.


अहेरी उपविभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पुरस्थितीजन्य स्थिती निर्माण झाली असून नदी, नाले दुथळी भरुन वाहत आहे. यामुळे नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पुरस्थितीमुळे कडकेली नाल्यावरुन पाणी वाहत असल्याने आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग, एटापल्ली-गट्टा अलगंडी रस्ता (बांडीया नदी) व चौखेवाडा-एटापल्ली- आलापल्ली राज्यमार्ग (एटापल्लीलगत स्थानिक नाला) आदी तीन मार्ग दिवसभर ठप्प पडले होते.



























