



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क
सिरोंचा (प्रतिनिधी )राज्यासह जिल्हात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे सिरोंचा तालुक्याला पुराचा धोका बळावला आहे. गोदावरीच्या अधिकच्या दाबामुळे प्राणहिता नदीला पूर येऊन अनेक गावात पुर परिस्थिती ओढावली असून शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. यामुळे भात,कापूस तसेच मिरची पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
प्रारंभी झालेल्या पावसामुळे शेतक-यांनी मोठ्या उत्साहात शेत कामास प्रारंभ केले होते. धानाचे फरे टाकणे, रोवणी करणे, कापूसातील गवत काढणे, औषधी फवारणी करणे, मिर्ची रोपवाटिकेचे देखाभाल करीत शेतकरी उत्साहित होता. मात्र एकाएक सिरोंचा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीसह शेजारच्या राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मेडीगड्डा धरण भरल्याने अनेक दरवाजे खोलून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्या जात आहे. याचा फटका तालुक्यातील नदी काठावरील गावांसह शेतजमीनीला बसला आहे. सद्यस्थितीत सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली असून शेतात पाणी घुसल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी संकट ओढावले आहे. सिरोंचाजवळील नद्यांचा संगम गोदावरी, प्राणहिता व अंतरवाहिनी असे असून गोदावरी नदीवर मोट्या प्रमाणात धरणे आहेत. सदर धरणे हाऊसफुल झाल्याने प्राणहिता नदी दुथळी भरुन वाहत आहे. या पुराचा फटका सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांना बसला आहे. मागील अनेक वर्षापासून पावसाळ्यात ही स्थिती उद्भवत असते. असे असतांनाही सिरोंचा तालुक्याला पूरग्रस्त म्हणून गोषित करण्यात आलेले नाही.


दरवर्षी पावसाळ्यात अनेक गावे पाण्याखाली जात असून हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली येत असल्याने पिकांची नासाडी होत आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्याला पूरग्रस्त गोषित करण्याची मागणी आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस नेते बानय्या जनगाम यांनी केली आहे.


























