


मागील काही दिवसांपासून तालुक्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीस शेजारच्या तेलंगणा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मेडीगड्डा धरण प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने धरणाच्या खाली असलेल्या गोदावरी नदीकाठावरील शेकडो हेक्टर शेतजमीन पुराखाली आल्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आणि मेडिगड्डा धरणाच्या बॅक वाटरमुळे मागील काही दिवसांपासून धान, कापूस, मिरची पिकासह अन्य पीक पाण्याखाली असल्याने ती कुजण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस नेता बानय्या जनगाम यांनी केली आहे.


तालुक्यात सतत पाच दिवस अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. यामुळे तालुक्यातील नदीकाठावर पुरस्थिती ओढावली आहे. अनेक गावात पुराचे पाणी घुसले होते. सद्यस्थितीत पुरस्थिती पूर्वपदावर असली तरी तेलंगणा राज्यातील मेडीगड्डा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदावरीसह प्राणहिता नदी दुथळी भरुन वाहत आहे. यामुळे या नदी काठावरील शेतशिवार पुर्णत: पुरात अडकले आहेत. या पूराचा सर्वाधिक फटका बामणी परिसरातील बामणी, वेंकटापूर, ग्लासफॉरर्डपेठा, बोरामपल्ली, गरकापेठा, कोटा, पोचपमपल्ली, रायपेठा, टेकडा, जाफ्राबाद, रंगय्यापल्ली, अमरावती, नारायणपूर, मेडराम, सिरोंचा या गावातील शेकडो हेकर शेत जमीन पाण्याखाली आल्याने नुकताच रोवणी केलेले धान रोवणी वाहून गेली असून मिरची, कापूस पिक पाण्याखाली आल्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

प्रशासन स्तरावरुन पंचनामे सुरु असले तरी शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असल्याने शासनाने तत्काळ आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस नेता बानय्या जनगाम यांनी केली आहे.


























