



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग ते परिवर्तन भवनाकडे जाणारा मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर खड्डा खोदण्यात आल्याने सदर रस्ता बंद झाला आहे. यामुळे या वार्डातील रहिवासींसह विद्यार्थ्यांना ये-जा करतांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सदर रस्ताच्या दुरुस्तीबाबत अनेकदा तक्रार करुनही संबंधित विभागाने कानाडोळा केल्याने रस्ता दुरुस्त करुन मार्ग प्रशस्त करण्याच्या मागणीला घेऊन परिवर्तन भवन परिसरातील रहिवासीयांनी गुरुवार, (दि.9) पासून तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारले आहे.
सविस्तर वृत्त असे की 2006 मध्ये पहिल्यांदा सिरोंचा ते आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग ते परिवर्तन भवन सिरोंचा येथे जाणारा रस्ता तयार करण्यात आला होता. त्यानंतर 2012-13 मध्ये सार्वजनीक बांधकाम विभाग सिरोंचामार्फत आमदार निधीमधून रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते. सदर मार्ग किमान 5 ते 6 हजार लोकसंख्येला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. सिरोंचा-आलापल्ली मार्गावर दोन शाळा असून विद्यार्थ्यांनाही या रस्त्याने शाळेत ये-जा करावी लागते. मात्र मुख्य रस्त्यावरच खड्डा खोदण्यात आल्याने सदर मार्ग बंद झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना मार्गक्रमण करतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत संबंधित विभागाला अनेकदा विनवणी करुनही याकडे कानाडोळा करण्यात आला. यामुळे सिरोंचा-आलापल्ली ते परिवर्तन भवन तसेच मुस्लीम कब्रस्थानला जोडणारा रस्ता पूर्ववत सुरु करण्यात यावा, या मागणीला घेऊन परिवर्तन भवन परिसरातील नागरीकांनी तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारले आहे.
या आंदोलनात शंकर बोरकुट, अमृतराव वाळके, बी. आय. बोरे, रमेश दुर्गम, अॅड. जयराम कोंडागुर्ले, सुरेश कोनम, समता चेन्नुरी, राजमल्लू काल्लूरी, सत्यम बुरम, मालेश आसम, अंकलू बुरम यांचेसह परिवर्तन भवन परिसरातील बहूसंख्य रहिवासी सहभागी झाले आहेत.






























