


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
गडचिरोली(प्रतिनिधी )
जिल्हा सत्र न्यायालयात सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावित असलेल्या जवानाचा स्वत:च्याच बंदूकीतून गोळी सुटून जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार, (दि.11) दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जिल्हा न्यायालय परिसरासह पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे. उमाजी केवळराम होळी (24) रा. बेलगाव ता. कोरची असे मृतक जवानाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, उमाजी होळी हे जिल्हा सत्र न्यायालयात सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्यरत होते. दुपारच्या सुमारास एकाएक न्यायालय आवारात गोळीबाराचा आवाज झाला. यावेळी न्यायालय परिसरात उपस्थित नागरिकांनी गोळीबाराच्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता पोलिस जवान उमाजी होळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला निदर्शनास आला. त्याच्या पोटातून पाच ते सहा गेळ्या आरपार गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तत्काळ जवानास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती प्राप्त होताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला केला. कर्तव्यावर असतांना चुकून त्याच्या बंदूकीतून गोळ्या सुटल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.

पोटातून घुसल्या 6 ते 7 गोळ्या –

2006 साली जिल्हा पोलिस दलात रुजू झालेल्या उमाजी होळी हा न्यायालयात सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावित होता. दरम्यान दुपारच्या सुमारास त्याच्या जवळील बंदूकीतून गोळ्या निघून थेट पोटात घुसल्या. बंदुकीतून सुमारे 6 ते 7 गोळ्या त्यांच्या शरिरातून आरपार गेल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस जवानाने आत्महत्या केली आणि अनावधनाने त्याच्या बंदुकीचे ट्रिगर दबून गोळ्या सुटल्या, हे वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही.





























