


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
हवामान विभागाने जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वारा, गारपीटीसह अवकाळी पावसाची शक्यत वर्तविली आहे. त्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळी वातावरण कायम असतांनाच जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या सिरोंचा तालुक्यात ठिकठिकाणी सोमवारी, (दि.7) दुपारच्या सुमारास वादळी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या विशेष म्हणजे तालुक्यातील सोमनपल्लीसह परिसरातील अनेक गावांना गारपीटीचा तडाखा बसल्याने या भागात शेतक-यांच्या पिकांना जबर फटका बसला आहे.
माच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोसळलेल्या अवकाळी पावसानंतर पुन्हा हवामान विभागाने एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील काही ठिकाणी विजेचा कडकडाट, वादळी वारे तसेच गारपीटीसही पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार जिल्ह्यातील काही ठिकाणी ढगाळी वातावरण कायम होते. तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या जिल्ह्यातील काही शेतक-यांच्या ऊन्हाळी धान पिकांसह, मिरची, कापूस, मका पिकांचे नुकसान झाले होते. विशेषत: जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या सिरोंचा तालुक्यात चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मिरची व कापूस पिकाला जबर फटका बसला होता. वाळवणीवर असलेली मिरची पावसात भिजल्याने मिरची उत्पादक शेतक-यांचे काहीअंशी नुकसान झाले होते. अशातच सोमवारी, दुपारी 3 वाजताच्या सुमारास पुन्हा सिरोंचा तालुक्यातील काही भागात वादळी वा-यासह गारपीटसदृश्य अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील सोमनपल्लीसह या परिसरातील अनेक भागात गारपीट झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. गारपीटीमुळे सोमनपल्ली परिसरातील मिरची उत्पादक शेतक-यांना पुन्हा पावसाने चांगलाच तडाखा दिला असल्याने मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
अवकाळीमुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात
मार्चच्या शेवटी व एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असे दहा दिवसांच्या कालावधीत दोनदा झालेल्या अवकाळीमुळे सिरोंचा तालुक्यातील मिरची उत्पादक शेतक-यांना जबर फटका बसला होता. पावसात मिरची भिजल्या गेल्याने 20 टक्के मिरची खराब झाल्याने मिरची उत्पादक शेतकरी हताश झाला होता. दरम्यान भिजलेली मिरची वाळवणीवर टाकली असतांनाच सोमवारी, पुन्हा सोमनपल्ली परिसरात गारपीटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सर्वसामान्यांसह शेतक-यांची तारांबळ उडाली. पावसात भिजलेली मिरची वाळवणीसाठी टाकली असतांना पुन्हा मिरची पावसात भिजल्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे.






























