अहेरी उपविभागात स्मार्ट मीटरची प्रक्रिया थांबवा; अन्यथा जनआंदोलन -भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राकॉंचा इशारा

189

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
अहेरी (प्रतिनिधी)
महावितरण कंपनीद्वारे सद्यस्थितीत ग्राहकांच्या घरामध्ये स्मार्ट मीटर बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र या स्मार्ट मीटर संदर्भात अनेक समस्या असून यामुळे ग्राहकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर होईस्तोवर स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवावी, अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात राकॉंने (शरद पवार गट) दिला आहे.
आलापल्ली महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात राकॉं पदाधिका-यांनी म्हटले आहे की, महावितरणद्वारे स्मार्ट मीटर बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, या स्मार्ट मीटर संदर्भात अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने या मीटरमुळे वीज बिलात अचानक वाढ होण्याची शक्यता असल्याने हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी भूर्दंड बसवणारी ठरणार आहे. तसेच अनेक दुर्गम, ग्रामीण भागात नेटवर्कची सुविधा उपलब्ध उपलब्ध राहत नसल्याने सदर स्मार्ट मीटर योग्य रितीने कार्य करण्याची शाशंकता आहे. यामुळे ग्राहकांना नाहक त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच दुर्गम, ग्रामीण भागातील अनेक ग्राहक अशिक्षित असल्याने स्मार्ट मीटरचा वापर करणे, समजून घेणे किंवा त्यासंबंधित अडचणी सोडविणे या ग्राहकांना अत्यंक कठीण जाण्याची शक्यता आहेत. स्मार्ट मीटरमधील तांत्रीक अडचणी लक्षात घेता सदर मीटर बसवण्याची प्रक्रिया तत्काळ थांबविण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशारा राकॉं पदाधिका-यांनी कार्यकारी अभियंता जी. ह. वाघमारे यांना निवेदनातून दिला आहे. यावेळी शिष्टमंडळात माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राकॉं महिला विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम, आलापल्ली ग्रा. पं. सदस्य स्वप्नील श्रीरामवार, श्रीनिवास विरगोनवार, अमोल मुक्कावार, श्रीनिवास चहारे, संदीप मुम्मुलवार, अॅड. पी. एन. दहागावकर, सुमित मोतकुरवार, अब्दूल हुसेन शेख आदींचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here