


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या सिरोंचा तालुक्यातील बुधवारी, (दि.21) दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. या अवकाळीमुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे तोडणी झालेल्या मिरची पिकाला या अवकाळी पुन्हा प्रचंड फटका बसला आहे.
मागील दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊस शेतक-यांची अग्निपरीक्षा घेतांना दिसून येत आहे. मार्च तसेच एप्रिल महिन्यात अधुनमधून झालेल्या अवकाळीमुळे ऊन्हाळी धान, कापूस, भाजीपाला पिकासह मिरची पिकाला फटका बसला होता. यातून कसेबसे सावरित शेतक-यांनी पिकांचे संरक्षण केले. सद्यस्थितीत मिरची अंतिम टप्प्यात असून अनेक शेतक-यांनी मिरचीची तोडणी करुन शेतात वाळविण्यासाठी टाकले आहे. अशातच बुधवारी दुपारच्या सुमारास एकाएक वातावरणात बदल होऊन विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. या वादळी पावसामुळे वाळवणीवर असलेली मिरची पुरता भिजल्या गेली. यामुळे मिरची उत्पादकाचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले मिरचीचे पीक अवकाळीने हिरावल्याने शेतक-यांना प्रचंड धक्का बसला आहे.

विद्यूत तारा कोसळल्याने विद्यूत सेवा बंद
सिरोंचा शहरासह तालुक्यातील अनेक ग्रामीण, दुर्गम भागाला वादळी अवकाळीने थैमान घातले होते. वादळी वा-यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून विद्यूत तारांवर पडल्याने विद्यूत सेवा ठप्प पडली होती. रात्री उशिरापर्यंत महावितरणद्वारे विद्यूत सेवा सुरळित करण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, तालुक्यातील दुर्गम क्षेत्रातील अनेक गावांना संपूर्ण रात्र अंधारात चाचपडत जागून काढावी लागली.






























