तस्करांकडून 34 गोवंशाची सुटका -सिरोंचा पोलिसांची कारवाई

475

सिरोंचा (प्रतिनिधी)
सिरोंचा तालुक्यातून तेलंगाणा राज्यात गोवंश तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून तस्करांकडून 34 गोवंशाची सुटका केल्याची कारवाई आज, 2 जून रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास केली.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या सिरोंचा तालुक्यातून तेलंगाणा राज्यात गोवंश तस्करी होणार असल्याची माहिती सिरोंचा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी राज्य सीमेवर ये-जा करणाऱ्या वाहनांना थांबवून तपासणी सुरु केली. दरम्यान, अहेरी मार्गाने एमएच 34 बीझेड 4871 क्रमांकाचा संशयीत ट्रक येताना दिसून येताच सदर ट्रकला थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये गोवंश असल्याचे आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली असता, ट्रकमध्ये 34 गोवंश दाटीवाटीने भरलेले होते. पोलिसांनी ट्रकसह लाखोंचा मुद्देमाल जप्त करून गोवंशांची सुटका केली. वाहन व चालकाला ताब्यात घेतले. सदर कारवाई सिरोंचाचे पोलिस निरीक्षक समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पथकाने केली.

जनावरांची खरेदी करणारे दलाल सक्रिय-
जनावर तस्करीवर बंदी असली तरी गडचिरोली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात तेलंगाणा, आंधप्रदेश, छत्तीसगड राज्यात जनावर तस्करी केली जाते. सध्या ग्रामीण भागात जनावर खरेदी करणारे दलाल सक्रिय झाले असल्याचे दिसून येत आहे. दिवसभरात अनेक गावात फिरून हे दलाल जनावरांची खरेदी करतात. त्यानंतर रात्रीच्या सुमारास जनावरे ट्रकमध्ये भरून तस्करी केली जाते. पोलिसांना चकमा देत मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here