गीतारहस्य”मधील स्वर्ग – नरक लेखक : ज्ञानेश महाराव

234

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
विष्णू पुराणात नसलेली “भगवद्गीता” कशी आणि कधी प्रकटली? युद्ध सुरू असताना ते थांबवून श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करू शकतो का? श्रीकृष्ण हा उपदेश करीत असताना महर्षी व्यासांनी तो भर रणांगणात मांडी ठोकून लिहून घेतला का? असे प्रश्न उपस्थित करीत ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांनी “श्रीमद्भगवद्गीता”ची सर्वकालिक उपयुक्तता सांगितली आहे. ती पुरेशी का नाही?*

जगात अनेक धर्म आहेत – त्यातील प्रमुख धर्म ख्रिस्ती (धर्मग्रंथ : बायबल), इस्लाम (कुराण), बौद्ध (त्रिपिटक), ज्यू ऊर्फ यहुदी (तनाख), शीख (गुरू ग्रंथ साहिब), जैन (आगम), ताओ (ताओ ते चिंग), पारशी (अवेस्ता) हे आहेत. ह्या धर्मांचे प्रमुख धर्मग्रंथ एकच आहेत. या उलट स्थिती भारतात बहुसख्यांक असलेल्या “हिंदू” धर्माची आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्या (१४६ कोटी) असलेल्या भारतात ७६.४५ % लोकसंख्या “हिंदू” आहे. सध्या भारत आणि नेपाळ देशात मिळून जगातील ९५% हिंदू राहतात. या दोन देशांसह जगात आज १२० कोटी “हिंदू” धर्मीय आहेत. ही संख्या जगातील लोकांच्या १५% आहे. या बळावर “हिंदू” धर्म हा जगात तिसऱ्या क्रमांकाचा मोठा धर्म ठरलाय.
‘जगातील सर्वात जुना’ अशीही हिंदू धर्माची ओळख आहे. मात्र, हिंदू धर्माला अन्य धर्मांप्रमाणे एकच एक असा धर्मग्रंथ नाही. ४ वेद
(ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद), १८ पुराणे, (विष्णू पुराण, गरुड पुराण आदि), १०८ उपनिषदे (ह्यात आत्मा, परमात्मा, मोक्ष यावर वादाच्या आधारे विश्लेषणात्मक लेखन आहे.), ६ शास्त्रे अर्थात षड्दर्शने (सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि वेदान्त) ; याशिवाय रामायण, महाभारत, भगवद्गीता, स्तोत्रे, व्रत वैकल्याच्या धार्मिक पोथ्या, संत साहित्य अशा अनेकांना हिंदूंचे धर्मग्रंथ म्हणून मान्यता आहे.
तथापि, ह्या साऱ्यात “भगवद्गीता”चे स्थान वरचे आहे. त्याचे कारण ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार – संपादक सुरेश द्वादशीवार यांनी अत्यंत सोप्या आणि नेमक्या शब्दांत अलीकडे सांगितले आहे. ते ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या वाढदिवसानिमित्ताने (२२ जुलै २०२५) नागपुरात केलेल्या भाषणात बोलत होते. ह्या भाषणात त्यात त्यांनी वेद, रामायण, महाभारत लेखनाचा काळ सप्रमाण सांगितला; आणि ह्या क्रमवारीत, विष्णू पुराणात नसलेली “भगवद्गीता” कशी आणि कधी प्रकटली, ह्याचा तपशीलही सांगितला. ( हे माहिती – ज्ञान सविस्तरपणे समजून घेण्यासाठी “At post marathi” ह्या यूट्यूब चॅनलवरचा व्हिडिओ आवर्जून पहा.) ह्यात त्यांनी युद्ध सुरू असताना ते थांबवून श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करू शकतो का? श्रीकृष्ण हा उपदेश करीत असताना महर्षी व्यासांनी भर रणांगणात मांडी ठोकून लिहून घेतला का? हे प्रश्न उपस्थित करून ; आद्य शंकराचार्यांच्या “गीताभाष्य”मधून “भगवद्गीता” घेतली गेलीय, हे सुरेश द्वादशीवार यांनी सांगितले. “धर्म व धर्मग्रंथ चिकित्सा हे पाप असल्याने माझ्यासाठी मी नरकात जागा बुक करून ठेवलीय,” असेही ते म्हणालेत.
“महाभारत”मधील युद्धात पांडव – कौरव आमनेसामने उभे ठाकले. निकराच्या क्षणी कौरव सेनापती कर्ण व अर्जुन समोरासमोर आले. त्यावेळी रथाचे चाक अचानक रुतल्याने कर्ण ते काढण्यात गुंतला. हीच वेळ त्याला मारण्याची आहे, “शरसंधान कर” असा सल्ला सारथी झालेल्या कृष्णाने अर्जुनाला दिला. त्याने अर्जुन गांगरला. गळपटला. त्याला तो अधर्म वाटला. ‘आपलेच काका, मामे, भाऊबंद मारून आपण कोणता धर्म जागवणार आहोत’, असा प्रश्न त्याला सतावू लागला. तेव्हा श्रीकृष्णाने अनीती, अन्याय संपवून समाजाला सन्मार्गावर आणण्यासाठी, नातेसंबंध बाजूला ठेवून युद्ध करणे आवश्यक कसे आहे ते अर्जुनाला सांगितले आणि “तस्मात् युद्धस्य भारत” हा उपदेश केला. अर्जुन तसा वागला. त्याला अधिक हिंमत देण्यासाठी “श्रीमद्भगवद्गीता” अध्याय २, श्लोक ३७ मध्ये नागवंत श्रीकृष्ण म्हणतात –
*”तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।*
*यावत् धर्मस्ततो जयः यतो धर्मस्ततो जयः॥”*
अर्थात, “हे अर्जुना, सज्ज हो आणि युद्ध करण्याचा दृढ़ निश्चय कर! जिथे धर्म आहे, तिथे विजय होणार!”
अशाच प्रकारे अन्याय, अत्याचाराविरोधात समाजाला सज्ज करण्यासाठी आद्य शंकराचार्यांनी “गीताभाष्य”मधून संन्यस्तधर्म (अनासक्ती) सांगितला. संत ज्ञानेश्वरांनी “ज्ञानेश्वरी”द्वारे मोगल आक्रमकांपासून भाषा व संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी “भक्तियोग” सांगितला. लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्यासाठी “गीतारहस्य”मधून “कर्मयोग” सांगितला. तर महात्मा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्याचा लढा निर्णायक करण्यासाठी अहिंसेचा आग्रह धरणारा “सत्ययोग” (सत्याग्रह) सांगितला. आद्य शंकराचार्यांप्रमाणेच संत ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांनी त्यांना जे सांगायचे होते, ते “भगवद्गीता”च्या आधारे सांगितले. अशी सुरेख मांडणी सुरेश द्वादशीवार यांनी केली. यातून “भगवद्गीता”ला सर्वोच्च हिंदू धर्मग्रंथांचा मान का मिळाला आणि तिची लोकप्रियता का टिकून राहिली, ते अधोरेखित करणारा आहे.
काळाच्या आणि समाजाच्या गरजेनुसार अर्थ काढता आला, म्हणून “भगवद्गीता”ची उपयुक्तताही टिकून राहिली. पण त्यातून धर्मांधता वाढावी, असा उद्देश कुणी बाळगला नव्हता. खुद्द “भगवद्गीता”मधून श्रीकृष्णाने जो धर्म सांगितला, त्याचा अर्थ “नैतिक कर्तव्य” असाच होतो. तसेच, कौरव – पांडव यांच्यातील युद्ध हे दोन धर्मांतील नव्हते. कृष्ण पांडवांबरोबर होता आणि त्याचे यादव सैन्य कौरवांच्या दिमतीला होते. ह्या सर्वांचा धर्म एकच होता. म्हणूनच “यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत” ह्या श्लोकाचा दाखला देत परधर्मीयांविरोधात हिंदूंना भडकवणे, त्यांना कट्टर करणे, हा अधर्म ठरतो.
यावर रट्टा ओढताना सुरेश द्वादशीवार यांनी थोर विचारवंत प्राध्यापक नरहर कुरुंदकर यांची साक्ष काढलीय. कुरुंदकर म्हणत, “आपल्या सर्वांच्या मनात धर्मग्रंथांविषयी अपार आदर असतो; कारण आम्ही ते वाचत नाहीत.” यासाठीच संत ज्ञानेश्वर “एक तरी ओवी अनुभवावी” अशी विनंती “ज्ञानेश्वरी”त करतात. त्यासाठी गीता वाचा किंवा ज्ञानेश्वरी! त्यातील “धर्म” अनुभवण्यासाठी मात्र ते ग्रंथ आध्यात्मिक भावनेने नव्हे, तर त्यात दडलेली जीवनमूल्यं समजून घेण्यासाठी वाचा.
“ज्ञानेश्वरी” हे गीतेचंच निरूपण आहे. पण ‘गीता’ अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायची, तर लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं ‘गीतारहस्य’ वाचावं. त्याहून सोप्या रीतीने ‘गीता’ समजून घ्यायची, तर आचार्य विनोबा भावे यांची रसाळ मराठीतील ‘गीताई’ वाचावी. तथापि, गीतेत नेमकी कोणती जीवनमूल्यं दडली आहेत, हे समजून घ्यायचं तर थोर समाजशास्त्री, धर्मचिकित्सक, “शुद्धाशुद्ध इतिहासकार” पंडित काशिनाथ शिवमूर्ती संकाये (नांदगावकर) यांचा “सनातनी धर्मग्रंथांची मानवघातकी शिकवण” हा ग्रंथ वाचावा. या ६०-७० पानांच्या सत्यशोधकी ग्रंथात (सुगावा प्रकाशन, पुणे) त्यांनी ‘भगवद्गीता’ची शास्त्रशुद्ध चिकित्सा करून त्यातील मानवविरोधी हिंसक तत्त्वज्ञानाचं प्रदर्शन घडवलंय. यामुळेच थोर साहित्यिक व समाजसुधारक श्री. म. माटे (जन्म : २ सप्टें. १८८६; मृत्यू : २५ डिसें. १९५७) यांनी “ही भगवद्गीता अपुरी आहे!” आणि “मूळची गीता निराळी असली पाहिजे!” असे दोन लेख साधारणपणे ७५ वर्षांपूर्वी लिहिले होते. त्यात त्यांनी “श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनातला ’मी युद्ध करीत नाही’ हा विषाद घालवून त्याला युद्धाला तयार केले; हे जे आज गीतेचं स्वरूप दिसतं, ते अपुरं आहे,” अशी मोठी धक्कादायक भूमिका मांडली होती.
माटेंच्या मते, अर्जुनाच्या या विषादाची दोन कारणं होती. “बांधवांना मारून राज्य नको. असल्या राज्याची मला आवश्यकता नाही,” असं अर्जुन स्पष्टपणे सांगत होता. त्याला बंधूवधाचं पातक नको होतं आणि युद्धामुळे होणारा सामाजिक नरकवासही नको होता. या सामाजिक नरकवासाचं स्वरूप अर्जुनाने खूप विस्ताराने श्रीकृष्णापुढे ठेवलं आहे. ते गीतेत आहे. “कुळक्षय झाल्याने सनातन कुळधर्म नष्ट होतात. ते नष्ट झाले म्हणजे कुळावर अधर्माची छाप पडते. अधर्म माजला म्हणजे, कुळस्त्रिया बिघडतात. कुळस्त्रिया बिघडल्या की, वर्णसंकर होतो. वर्णसंकर झाला की, तो कुळ घातकांना आणि कुळाला नरकात नेतो,” असं खूप काही भय अर्जुन व्यक्त करतो.
अर्जुनाने व्यक्त केलेल्या या दोन भयांपैकी फक्त बंधूवधाचं भय श्रीकृष्णाने गीतेत दूर केलंय. मात्र, दुसर्‍या सामाजिक नरकवासाच्या भयाचं निवारण श्रीकृष्णाने गीतेत केलेलं दिसत नाही. युद्धाने लक्षावधी तरुण मरतील. समाजाची प्रचंड हानी होईल. सर्वत्र अनाचार माजेल, हे अर्जुनाला वाटणारं भय किती खरं होते, ते महाभारतात दिसतं. पण हा सगळा संस्कृतीचा विनाश दिसत असूनही श्रीकृष्णाने अर्जुनाला वाटणारे सामाजिक नरकाचं भय तसंच ठेवून त्याला युद्धात लोटलं. ही विचित्र गोष्ट का. शि. संकाये आणि श्री. म. माटे यांनी आपापल्या विचारधारेनुसार मांडलीय.
गीतेतल्या या विचित्रपणाला का. शि. संकाये “मानवी मूल्यविरोधी” म्हणतात; तर श्री. म. माटे यांना तो “गीतेचा अपुरेपणा” वाटतो. “सामाजिक नरकवास म्हणजे युद्धाने होणारे सांस्कृतिक, सामाजिक विध्वंस लक्षात घेऊन, केवळ दुर्योधनाला नष्ट करण्याचा मार्ग श्रीकृष्ण नक्कीच काढू शकला असता. तरीही त्याने या महाप्रचंड संहारात अर्जुनाला का ढकलले,” असा प्रश्न श्री. म. माटे उपस्थित करतात. या लेखांचं स्मरण एवढ्यासाठीच झालं की, सर्वनाश दिसत असूनही तो टाळण्याऐवजी कायमचा सोक्षमोक्ष करून घेण्याचं साक्षात श्रीकृष्णालाही टाळता आलेलं नाही. अशा गीतेचे वाचन कोणता वा कुणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी करायचे? ते सुरेश द्वादशीवार यांनी नरहर कुरुंदकर यांच्या चष्म्यातून सांगितले असते तर बरे झाले असते. त्यायोगे पुण्य पदरात पडून त्यांना स्वर्गातील जागाही बुक करता आली असती.
सर्वनाश समोर दिसत असूनही तो टाळण्याऐवजी कायमचा सोक्षमोक्ष करून घेण्याचं ‘महाभारत’ साक्षात भगवंत श्रीकृष्णालाही टाळता आलं नाही. तेव्हा असा अतिरेकी मोह टाळण्याची अपेक्षा सत्ताप्राप्तीसाठी मंदिर-मशीद वाद पेटवणार्‍या आणि महाभारतात कल्पिलेल्या श्रीकृष्णाच्या नखाएवढीही बौद्धिक- राजनैतिक- सामाजिक कुवत निश्चित नसणार्‍या आजच्या “अंधभक्तसिद्ध विष्णू” अवताराकडून करता येऊ शकत नाही. सुरेश द्वादशीवार सांगतात, “ज्या ग्रंथातून लोकांना आपल्या सोयीनुसार अर्थ काढता येतात, तो लोकप्रिय होतो.” हेच भगवद्गीता,
रामायण- महाभारत वा अन्य पुराणकथा ह्यांचे सामर्थ्य आहे. तथापि, हे ग्रंथ म्हणजे मानवी जीवनाचा इतिहास नाही. त्याला इतिहास समजल्यास ‘इसापनीती’ वा ‘पंचतंत्रा’तल्या बोलक्या पशु – पक्ष्यांच्या कथाही खर्‍या ठरतील आणि माणूस म्हणून आपली मोठी पंचाईत होईल! ती टाळण्यासाठी भगवद्गीतेत सांगितलेला “नैतिक कर्तव्याचा धर्म” आपल्या बौद्धिक उन्नतीसाठी अनुभवावा.

धर्मग्रंथांची जागतिक मांदियाळी –
जगात सर्वाधिक धर्मीय ख्रिस्ती आहेत. (२५० कोटी) त्यांचा धर्मग्रंथ एकच आहे. “बायबल” ! यात ‘जुना करार’ – Old Testament आणि ‘नवीन करार’ – New Testament असे दोन भाग आहेत.
# ख्रिस्ती खालोखाल “इस्लाम” धर्मीयांची संख्या जगात आहेत. (२००कोटी) त्यांचाही धर्मग्रंथ एकच आहे. “कुराण”! मुस्लिम परंपरेनुसार “कुराण” हा देवाचा खरा शब्द असून, तो प्रेषित मुहम्मद यांना अरबी भाषेत मुख्य देवदूत जिब्रिल (गेब्रिएल) यांच्या मध्यस्थीद्वारे लाभला. अशी मुस्लिमांची श्रद्धा आहे.
# ख्रिस्ती व मुस्लिम प्रमाणेच बौद्ध धर्मीय बहुसंख्यांक असलेले अनेक देश जगात आहे. जगभरात बौद्ध धर्मियांची संख्या ५२ कोटी आहे. त्यांचाही धर्मग्रंथ एकच आहे. “त्रिपिटक”! त्यात तथागत बुद्धांच्या उपदेशाचा, निती- नियमांचाआणि तत्वज्ञानाचा संग्रह आहे.
# १९४८ मध्ये इस्राएल हा “ज्यू” (यहुदी) धर्मियांचा देश म्हणून निर्माण झाला. त्यापूर्वी आणि आताही ज्यू जगभर आहेत. (सध्या त्यांची संख्या १ कोटी ४० लाख आहे.) तरीही त्यांचा धर्मग्रंथ एकच आहे. “तनाख”! तो “हिब्रू” भाषेत असून, ते ज्यू धर्माच्या तोराह, नेव्हीम व केतुव्हिम ह्या तीन प्रमुख ग्रंथांचे एकत्रित रूप आहे.
# भारतात स्थापन झालेल्या “शीख” धर्माचे प्रमुख राज्य पंजाब आहे. तथापि, शीख धर्मीय व्यवसायाच्या निमित्ताने जगभर पोहोचलेत. सध्या त्यांची लोकसंख्या २ कोटी ५० लाख आहे. “गुरू ग्रंथ साहिब” हा त्यांचा धर्मग्रंथ आहे. गुरू नानकजी यांनी स्थापन केलेल्या शीख धर्माचे नेतृत्व १० जणांनी केले. गोविंदा सिंग हे दहावे गुरू. त्यांनी दहा गुरू व त्यांच्या समकालीन संतांनी केलेल्या उपदेशांचा मिळून तयार झालेल्या “ग्रंथ साहिब” ह्या ग्रंथालाच गुरू मानण्याचा आदेश दिला. ह्या ग्रंथात वारकरी संप्रदाय संस्थापक संत नामदेव यांच्या ६२ अभंगांचा समावेश आहे.
# “जैन” हादेखील भारतीय भूमीत निर्माण झालेला धर्म आहे. आज त्यांची लोकसंख्या भारतासह अंदाजे १ कोटी आहे. त्यांचाही मुख्य धर्मग्रंथ एकच आहे. “आगम” ! त्याला “जैन आगम” (Jain Agamas) असेही म्हणतात. भगवान महावीर यांच्या शिकवणुकीवर आणि उपदेशांवर आधारित हा धर्मग्रंथ आहे. त्याचे संकलन महावीर यांच्या निकटवर्ती गणधरांनी केल्याचे मानले जाते.
# याशिवाय, जगभरात अनेक धर्म, पंथ, संप्रदाय आहेत. चीन १४० कोटी लोकसंख्येचा आणि सर्वाधिक उत्पादन करणारा बलाढ्य देश आहे. भारताबरोबरच स्वतंत्र राष्ट्र झालेल्या ह्या देशात सलग कम्युनिस्ट राजवट आहे. कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेल्यांना कोणत्याही धर्माचे पालन करण्यास सक्त मनाई आहे. तरीही हा देश पूर्णपणे “नास्तिकवादी” होऊ शकला नाही. चीन मधील ३१% लोकसंख्या “नास्तिक” आहे. बाकीची लोकसंख्या बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन (प्रोटेस्टंट व केथॉलिक), ताओ ह्या नोंदणीकृत धर्मात विखुरलेली आहे. “ताओ” हा चिनीभूमीतला प्राचीन धर्म आहे. आज चीनमध्ये ताओ धर्मियांची ९० लाख आहे. त्यांचा मुख्य धर्मग्रंथ “ताओ ते चिंग” (Tao Te Ching) आहे. ते लाओत्से (Lao Tzu) यांनी लिहिले आहे, असे मानले जाते. हा ताओ (मार्ग) आणि त्याच्याशी संबंधित शिकवणींवर प्रकाश टाकणाऱ्या कवितांचा संग्रह आहे.
# “ताओ” प्रमाणेच “झोरास्ट्रियन” हादेखील प्राचीन धर्म आहे. त्याचे मूलस्थान इराणमध्ये म्हणजे पूर्वीच्या “पर्शिया” आहे. म्हणून गुजरात मार्गे भारतात आलेल्या ह्या लोकांना “पारशी” म्हणतात. “झोरोस्टर” (भारतीय त्याचा “जरथुष्ट्र” असाही उच्चार करतात.) हे त्यांचे धर्मसंस्थापक आहेत. त्यांनी सांगितलेला धर्म एक ईश्वरवादी आहे. ते “अहुरा माजदा” (Ahura Mazda) या देवाची पूजा करतात. तो चांगुलपणा, प्रकाश आणि सत्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. भारतातही त्यांची सर्वाधिक लोकसंख्या असली तरी हा जगात दखलपात्र असलेला सर्वात कमी लोकसंख्या (२ लाख ५ हजार) असलेला धर्म आहे. त्यांचाही धर्मग्रंथ एकच आहे. “अवेस्ता”! यात पारशी धर्माच्या शिकवणुकी, प्रार्थना, विधी आणि नैतिक तत्वांचा समावेश आहे. ह्या ग्रंथासोबत “झेंड” नावाचा एक भाष्यग्रंथ देखील आहे. त्यात “अवेस्ता”तील मजकुराचे स्पष्टीकरण देतो. या दोन्ही ग्रंथांचा मिळून ‘झेंड अवेस्ता’ (Zend Avesta) हा धर्मग्रंथ होतो.

(साभार : दै. देशोन्नती)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here