


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी) रक्षाबंधन सणानिमित्य दुचाकीने संपूर्ण कुटूंबीय दुचाकीने जात असतांना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रालीला दुचाकीची भिषण धडक बसल्याने आठ वर्षीय चिमूकला जागीच ठार तर आईवडील गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी, (दि.9) दुपारच्या सुमारास तालुक्यातील अंकिसा मार्गावर घडली. शौर्य संतोष कोकू (8) असे मृतक चिमुकल्याचे नाव असून पिता संतोष रामलू कोकू (43) व आई सौंदर्या कोकू अशी जखमींची नावे आहे. या घटनेने रक्षाबंधनासारख्या आनंददायी सणाच्या पार्श्वभूमीवर कोकू कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार असरअल्ली येथील कोक्कू कुटुंब आपल्या नातेवाईकांकडे, बहिणीला राखी बांधण्यासाठी, दुचाकीने सिरोंचा दिशेने निघाले होते. मात्र अंकिसा गावाजवळ पोहोचताच रस्त्याच्या कडेला निष्काळजीपणे उभी असलेल्या रामकृष्ण चिरला यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला त्यांच्या दुचाकीची भीषण धडक बसली. अरुंद मार्ग, उभी केलेली ट्रॉली आणि वेळीच दिसून न आल्याने ही घटना घडली. धडकेचा जोर इतका होता की, यात शौर्यचा जागीच मृत्यू झाला. संतोष कोकू यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली असून आई सौंदर्या कोकू किरकोळ जखमी झाल्या. त्यांना सिरोंचा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र संतोष कोकू यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने तेलंगणातील वारंगल येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. आई सौंदर्या कोकू यांच्यावर स्थानिक पातळीवर उपचार सुरू आहेत. सिरोंचा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच कोकू कुटुंबाचा संसार उध्वस्त झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून रस्त्यावरील अतिक्रमण व निष्काळजीपणे वाहने उभी केली जात असल्याने अपघाताचे सत्र सुरु असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अशा वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी जातर धरत आहे.






























