


T NEWS मराठी नेटवर्क
सिरोंचा – तिरुपती चिट्याला
राष्ट्रीय पेसा महोत्सव २०२५ चे आयोजन नुकताच आंध्रप्रदेश राज्यातील विशाखापट्टणम येथे मोठ्या उत्साहात पार पडले़ या महोत्सवात पेसा अंतर्गत येत असलेल्या देशभरातील आदिवासी बांधव, सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व इतर लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते़ या सर्वांचे प्रतिनिधीत्व सिरोंचा तालुक्यातील व्यंकटापूरचे सरपंच अजय आत्राम यांनी करीत आदिवासी बांधवांना पेसा अधिनियमाबाबत मार्गदर्शन करीत जल, जंगल, जमीनेचे संरक्षण करण्यासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले़
या पेसा महोत्सव निमित्ताने देशभरातून निवड झालेल्या लोकप्रतिनिधींमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील ग्रापं व्यंकटापूरचे सरपंच अजय आत्राम यांनी प्रतिनिधीत्व केले़ आंध्रप्रदेश राज्यातील विशाखापट्टनम जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा अरकूवेल्ली येथील डब्रीगुडा मंडलम किंचमुंडा ग्रामपंचायत हद्दीत पार पडलेल्या राष्ट्रीय पेसा मोहत्सवात त्यांनी देशभरातून आलेल्या आदिवासी बांधव, सरपंच, उपसरपंचाना मार्गदर्शन केले़ यावेळी त्यांनी दिल्ली, मुंबईत आमचेच सरकार, आमच्या गावातही आम्हीच सरकार, अशी हाक दिली़ गडचिरोली जिल्ह्यातील लेखा मेंढा या गावाने सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांच्या नेतृत्वात ‘आमच्या गावात आमचेच सरकार’ ही संकल्पना राबवित आदिवासी गावाचा चेहरामोहरा बदलला़ त्यांच्याच नेतृत्वात देशातून सर्वात प्रथम सामुहिक वनहक्क पट्टा लेखामेंढाला मिळवून दिला़ याअंतर्गत जिल्ह्यातील अनेक पेसा गावे विकासाच्या मार्गावर आली असल्याचे त्यांनी सांगितले़ याच तत्वावर देशभरातील पेसा गावांनी लढा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली़ अनुसूचित जमाती व इतर पांरपारिक वनहक्क मान्य करणे अधिनियम २००६, सुधारित नियम २००८ च्या कायद्यानुसार मिळालेले अधिकाराची कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन अजय आत्राम यांनी देशभरातील आदिवासी बांधवांना केले़
कलम ३ (१) झ नुसार सामुहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांना जंगलाचे स्वरक्षण, स्वर्धन करण्याचा अधिकार ग्रामसभेला मिळाला आहे. जल-जंगल-जमीन यांचे व्यवस्थापन करण्याकरिता सामुहिक ग्रामसभा ३० नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार रोजगार हमी यंत्रणा म्हणून ग्रामसभा समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सदर कामे ग्रामसभाच्या पुढाकाराने पुर्णत्वास येत असल्याचे त्यांनी सांगितले़ गडचिरोली जिल्हा ७६ टक्के जंगलाने व्याप्त असून जंगल हेच येथील आदिवासींचे श्वास असल्याने देशभरातील आदिवासी बांधवाने आपल्या जल, जंगल, जमिनीचे संरक्षण करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीप्रमाणेच लढा उभारण्याचे आवाहन सरपंच अजय आत्राम यांनी यावेळी केले़
या राष्ट्रीय स्तरावरी पेसा मोहत्सवात देशभरातील पेसा अंतर्गत येत असलेले सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते़






























