


T NEWS मराठी नेटवर्क-
एटापल्ली (प्रतिनिधी)
येथील भारतीय स्टेट बँक शाखेत महिनाभराच्या कालावधीत दोनदा चोरीचा प्रयत्न करणा-या आरोपीचा छडा लावण्यात अखेर एटापल्ली पोलिसांना यश आले आहे़ तपासाची चक्रे फिरवित एटापल्ली पोलिसांनी चक्क छतीसगड राज्यातून त्याचे राहते घरुन आरोपीस अटक करण्यात आली. बिभास ऊर्फ संजु बच्चु (२३) रा. पीव्ही ९२, पाखांजूर, जि. कांकेर, छत्तीसगड असे अटकेतील आरोपीचे नाव आहे़
सविस्तर वृत्त असे की, १६ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्री एटापल्ली येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या खिडकीतून आरोपीने प्रवेश करीत कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन व लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला होता़ मात्र एटीएम व लॉकर फोडण्यात अपयश आल्याने त्याला रोख रक्कम चोरी करता आली नव्हती़ या घटनेची नोंद एटापल्ली पोलिस ठाण्यात करण्यात आली होती़ सदर घटनेचा तपास सुरु असतांनाच ७ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्री पुन्हा त्याच पद्धतीने अज्ञात आरोपीने बँकेत प्रवेश करून लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला. महिनाभरातच दोनदा बँक लूटण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला़ ही बाब अत्यंत गांभीर्याने घेत एटापल्ली पोलिसांनी तपासाची गती वाढविण्यात आली़ उपविभागीय पोलीस अधिकारी व एटापल्ली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. त्यातून आरोपीची ओळख पटविण्यात यश आले़ बँक लूटीच्या दोन्ही प्रयत्ना छत्तीसगड राज्यातील बिभास उर्फ संजू बच्चू याचा हात असल्याचे सिद्ध झाले़
दुस-या घटनेनंतर अवघ्या २४ तासात एटापल्ली पोलिसांनी गुन्हा उघडकीस पोलिसांची पथक छत्तीसगड राज्यात रवाना करण्यात आले़ आरोपी बिभास उर्फ संजू बच्चू यास त्याच्या घरातून अटक केली. आरोपीची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली़ आरोपीच्या अटकेमुळे एटापल्ली येथील एसबीआय बँकेत दोनदा चोरी प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे़ या कामगिरीबद्दल एटापल्ली पोलिसांचे विशेष कौतूक होत आहे़ सदर कारवाई वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली चैतन्य कदम, पोलीस निरीक्षक मच्छींद्र नागरगोजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोतीराम मडावी, पोउपनि गजानन साखरे, मपोउपनि रोहिणी गिरवलकर, मपोउपनि प्रतिक्षा वणवे आदींसह पोलिस अमंलदारांनी पार पाडली.
आरोपीस पाच दिवसाची पोलिस कोठडी –
आरोपीस अटक केल्यानंतर विविध गुन्ह्याअंतर्गत नोंद करीत दोषारोपपत्र सादर करीत आरोपीसह न्यायालयात हजर करण्यात आले़ न्यायालयाने आरोपीस १२ जानेवारीपर्यंत पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे़ गुन्ह्याचा पुढील तपास मपोउपनि. रोहिणी गिरवलकर करीत आहेत.






























