



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क
लगाम (प्रतिनिधी )
नावेने नदीपात्रात मासेमारी करीत असताना संतुलन बिघडल्याने नाव नदीपात्रात बुडाल्याने एका युवकाचा बुडून मृत्यू झाला तर दोन युवक सुखरूप पाण्याबाहेर निघाल्याची घटना शनिवारला मुलचेरा तालुक्यातील येल्ला येथे घडली. भगवान आत्राम रा. येल्ला असे मृतक युवकाचे नाव आहे.
भगवान आत्राम या इतर दोन युवकांसह नावेच्या सहाय्याने नदीपात्रात मासेमारीकरीता गेला होता. नदीपात्रात मासेमारी करीत असताना अचानक संतुलन बिघडल्याने नाव पाण्यात बुडाली. यात दोन युवकांना पोहता येत असल्याने ते कसेबसे पाण्याबाहेर निघाले. मात्र भगवान आत्राम हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. बाहेर निघालेल्या दोन युवकांनी गावात जावून सदर घटनेची माहिती दिली. गावक-यांनी लागलीच नदीपात्र गाठून भगवानचा शोध घेतला असता, तो आढळून आला नाही. अखेर शनिवारला टिकेपल्ली नदीघाटात त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती अहेरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला.






























