



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
अहेरी (प्रतिनिधी)
तालुका मुख्यालयापासून अवघ्या 7 किमी अंतरावर असलेल्या महागाव बुज येथील एकाच घरातील चार जण व मावशी अशा पाच जणांचा पंधरा दिवसाच्या अंतराने रहस्यमय मृत्यू झाल्याने अहेरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या रहस्यमय मृत्यू श्रृंखलेचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान अहेरी पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
प्राप्त माहितीनुसार, शंकर तिरुजी कुंभारे यांचे महागाव बुज येथे फर्निचरचे दुकाने होते. त्यांना दोन मुले व एक मुलगी होती. मोठा मुलगा सागर हा दिल्ली येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. रोशन शंकर कुंभारे (29), कोमल विनोद दहागावकर (31) हे धाकटे. रोशनचा डिसेंबर 2022 मध्ये अकोला जिल्ह्यातील पातूर येथील संघमित्रा गवई हिच्यासोबत प्रेमविवाह झाला. कालांतराने संघमित्राच्या वडिलांचे पातूर येथे निधन झाल्याने सहा महिन्यांपर्यंत ती माहेरी होती. दरम्यानच्या काळात रोशनने पोस्टमास्तरची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर पोस्टमास्तर म्हणून तो सिरोंचा येथे कार्यरत होता. तो तिथेच पत्नीसह वास्तव्याने राहत होता. घटनेच्या दोन महिन्यापूर्वी रोशन व पत्नी संघमित्रा हे दोघेही महागाव बुज येथे आले. दरम्यान, 22 सप्टेंबरच्या रात्री जेवण केल्यानंतर रोशनच्या आईला विजया शंकर कुंभारे हिला डोकेदुखी सुरु झाली. त्यामुळे पती शंकर कुंभारे यांनी तिला आलापल्ली येथील दवाखान्यात भरती केले. याच दरम्यान शंकर कुंभारे यांनाही अस्वस्थ्य वाटू लागल्याने महागाव बुज येथील राकेश मडावी या वाहन चालकाच्या मदतीने दोघांनाही चंद्रपूर येथील दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना नागपूर येथील दवाखान्यात रेफर करण्यात आले. अतिदक्षता कक्षात दोघांवर उपचार सुरु असतानाच 26 सप्टेंबर रोजी पती शंकर कुंभारे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरु असतानाच 27 सप्टेंबरला पत्नी विजया कुंभारे यांचाही मृत्यू झाला. आईवडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने मुलगी कोमल विनोद दहागावकर हिची प्रकृती बिघडल्याने तिला ब्रम्हपुरीच्या खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले. प्रकृती सुधारल्यानंतर तिला गडअहेरी येथे आणण्यात आले. याच अवधीत रोशनचीही प्रकृती बिघडली. त्याना चंद्रपूर येथील दवाखान्यात अतिदक्षता कक्षात भरती करण्यात आले. दरम्यान, पुन्हा कोमलच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने अहेरी येथील दवाखान्यात भरती करण्यात आले. प्रकृती आणखीनच बिघडल्याने चंद्रपूरला नेत असतानाच वाटेतच तिचा मृत्यू झाला. आईवडिलांच्या मृत्यूच्या धक्क्यानंतर बहिणीच्या मृत्यूची वार्ता कळताच चंद्रपूर येथे उपचार घेत असलेल्या भाऊ रोशनची प्रकृती अधिकच बिघडली. त्याला नागपूरला हलविण्यात आले. उपचार सुरु असतानाच 15 ऑक्टोबर रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला. तर रोशनची मावशी आनंदा उराडे हिचाही 14 ऑक्टोबरच्या रात्री मृत्यू झाला. कुंभारे कुटूंबाला दवाखान्यात नेणा-या वाहन चालक राकेश मडावी याचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर चंद्रपूर येथील दवाखान्यात उपचार सुरु आहेत.






























