पहिल्याच पावसात वाहतूक कोंडी – सिरोंचा-आलापल्ली महामार्गाचे काम कासवगतीने

1043

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा (तिरुपती चिटयाला )
बहुप्रतिक्षेनंतर सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग 353 सी चे काम दीड वर्षापूर्वी सुरु करण्यात आले. परंतु काम कासवगतीने सुरु असल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसामुळे पाणी साचल्याने बेज्जूरपल्ली ते रोमपल्ली गावाच्या मधात वाहतूक कोंडी निर्माण झाली. मात्र याकडे संबंधित अधिका-यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
सिरोंचा-आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गाची मागील वर्षीच्या पावसाळ्यात पूर्णत: वाताहत झाली होती. राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गाने अवजड ट्रकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे मार्गाची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली होती. जागोजागी तलावाएवढे खड्डे पडून त्यात वाहने फसत होती. त्यामुळे दोन-तीन दिवस वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत होता. सततच्या मागणीनंतर या महामार्गाच्या बांधकामास मंजुरी मिळाली. त्यानंतर दीड वर्षापूर्वी रस्ता कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु काम कासवगतीने सुरु असल्याने अद्यापही 15 किमीचा रस्ता सुद्धा तयार करण्यात आलेला नाही. रस्ता कामासाठी जागोजागी खोदकाम करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसामुळे याठिकाणी पाणी साचून वाहने फसली. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागला. गेल्या वर्षी रेगुंठा, टेकडा, रंगय्यापल्ली व बामणी परिसरातील लोकांना तसेच विद्यार्थ्यांना पावसाळ्यात सिरोंचा किंवा अहेरी तालुकास्तरावर जावून आपली कामे करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. येत्या काही दिवसात पावसाळ्याला सुरुवात होत आहे. त्यामुळे कासवगतीने सुरु असलेल्या कामामुळे यावर्षीही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रस्त्याचे काम वेगाने करण्याकडे संबंधित कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत असल्याने सामाजिक जबाबदारी समजवून सर्व राजकीय पदाधिका-यांनी रस्त्यावर उतरून संबंधित कंत्राटदाराला धारेवर धरावे व समस्येचे निराकारण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here