धन्नूर (लगाम )गावच्या वनविभाग नाक्याजवळ एसटीचा अपघात -वाहकासह 5 जखमी

670

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क
लगाम (प्रतिनिधी )
नेहमीप्रमाणे अमरावतीसाठी राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवाशांना घेऊन जात असतांना लगाम-आष्टी मार्गावरील धनूर गावालगतच्या वनविभागाच्या नाक्याजवळ उलटल्या गेल्याने झालेल्या भीषण अपघातात बसच्या वाहकासह 4 प्रवासी असे एकूण 5 जण जखमी झाल्याची घटना शनिवारी, (25 मे) सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. सदर पाचही जखमींवर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराची बस क्र. एम. एच. 07 सी. 9463 नेहमीप्रमाणे 27 प्रवासी घेऊन अमरावतीच्या दिशेने निघाली. सदर बस अहेरी येथून वर्धा मार्गे अमरावतीला जाते. दरम्यान अहेरी तालुका मुख्यालयापासून 35 किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील धनूर गावाजवळील वनविभागाच्या फाट्याजवळ येताच समोरून येणा-या वाहनाला साईड देत असतांना बस एकाएक रस्त्याच्या खाली जाऊन खड्यात उलटल्या गेली. या भीषण अपघातात बस वाहक दीपक शंकर मेश्राम, पायल गुलाब झारे (20) रा. अहेरी, तबस्सुम अमजदखान पठाण (23), रियाज अमजदखान पठाण (19) दोघेही रा. नागेपल्ली आणि निमाई संन्यासी सरकार (34) रा. गिताली जखमी झाले. अपघातानंतर लगेचच बसचालक पी. आर. मेश्राम यांनी आगार व्यवस्थापक घागरगुंडे यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच आगार व्यवस्थापकांनी पोलिसांसह घटनास्थळी गाठले. तत्काळ जखमींना उपचारार्थ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. अपघातानंतर अन्य प्रवाशांसाठी दुस-या बसची व्यवस्था करीत प्रवाशांना अमरावतीच्या दिशेने रवाना करण्यात आले. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. सर्व जखमी प्रवासी आता सुखरूप असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here