



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क
गडचिरोली(प्रतिनिधी )
छत्तीसगड राज्यातील हिंसात्मक कारवायांसह विविध चकमकीत सहभागी असलेल्या महाराष्ट्र शासनाने 6 लाखाचे बक्षिस जाहिर केलेल्या जहाल नक्षल्याने मंगळवारी, (28 मे) गडचिरोली येथे केंद्रीय राखीव दलासमोर आत्मसमर्पण केले. गणेश गट्टा पुनेम (35) रा. बेच्चापाल, ता. भैरमगड, जि. बिजापूर (छत्तीसगड) असे आत्मसमर्पित नक्षल्याचे नाव आहे.
गणेश पुनेम हा 2017 मध्ये छत्तीसगड राज्यातील भैरमगड भागातील नक्षल्यांच्या पुरवठा समितीत सदस्य म्हणून सहभागी झाला होता. 2018 मध्ये त्याची याच समितीच्या उपकमांडरपदी नियुक्ती झाली तेव्हापासून तो या पदावर कार्यरत होता. 2017 मध्ये छत्तीसगडच्या मिरतूर आणि 2022 मध्ये तिम्मेनार येथे झालेल्या चकमकींमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. गणेश पुनेम याने केंद्रीय राखीव दलाचे पोलिस उपमहानिरीक्षक जगदीश मीणा यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्याला गडचिरोली जिल्हा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे कमांडंट नितीन कुमार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. गणेश पुनेम याने आत्मसमर्पण केल्याने शासनाने त्यास बक्षीस जाहीर केले आहे. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन त्याला 5 लाख रुपये बक्षीस जाहिर करण्यात आले आहे.

आतापर्यंत 14 जहाल – नक्षलींचे आत्मसमर्पण
गडचिरोली पोलिस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची संधी उपलब्ध करुन दिल्याने 2022 ते 2024 या कालावधीत आतापर्यंत एकूण 14 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.





























