


T NEWS मराठी नेटवर्क- चामोर्शी(प्रतिनिधी) “आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युतीसाठी प्रस्ताव दिला तर ५१ पैकी ३२ जागा मागू; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर लढेल,” असा ठाम इशारा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी रविवारी दिला. “अहेरीत इतर पक्ष आहेतच कुठे?” असे विचारत त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर उपरोधिक टीका केली.


ते चामोर्शी नगरपंचायत प्रांगणात झालेल्या जनकल्याण यात्रेच्या सभेत बोलत होते. या सभेला आमदार अमोल मिटकरी, सिने अभिनेत्री अमृता खानविलकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम, महिला जिल्हाध्यक्षा डॉ. सोनल कोवे, माजी जि.प. उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे, लौकिक भिवापुरे, नाना नाकाडे, तालुकाध्यक्ष निशांत नैताम, नगरसेवक राहुल नैताम, रिंकू पापडकर, ॲड. डिंपल उंदिरवाडे, डॉ. नोमेश जुवारे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेपूर्वी शहरातून पायी फेरी काढण्यात आली.

धर्मरावबाबा आत्राम यांनी या वेळी भाजपवर गंभीर आरोप करताना म्हटले, “मला विधानसभेत पराभूत करण्यासाठी भाजपने पुतणे अम्ब्रीशराव यांना डमी उमेदवार म्हणून उभे केले. पाच कोटी रुपये खर्च केले, तरी जनतेने माझ्या पाठिशी ठाम उभे राहून विजय मिळवून दिला.” ते पुढे म्हणाले, “कोनसरी येथील लोहनिर्मिती प्रकल्पात स्थानिकांनाच रोजगार मिळायला हवा. भेंडाळा परिसरातील १४ गावांची जमीन उद्योगासाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत, मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. एक इंचीही जमीन जाऊ देणार नाही; कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा आत्राम यांनी यावेळी दिला. सभेला जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























