मृतक नक्षलींमध्ये दोन डीव्हीसीएमसह तीन सदस्य -दोन पुरुष, तीन महिला नक्षलीचा समावेश; 38 लाखांचे होते बक्षिस -निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांचे मोठे यश

1251

गडचिरोली(प्रतिनिधी )
गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भामरागड तालुक्यातील कोपूर्ली जंगल परिसरात नक्षल्यांचा घातपातीचा प्रयत्न जिल्हा पोलिसांनी सोमवारी, (दि.21)उधळवून लावित पाच नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. यामध्ये दोन पुरुष व तीन महिलांचा समावेश होता. मृतक नक्षलींची ओळख पटविण्यात आली असून चकमकीत दोन डीव्हीसीएम वरिष्ठ कॅडरसह तीन दलम सदस्यांचा समावेश आहे. राज्य शासनाने पाचही जणांवर तब्बल 38 लाखांचे बक्षिस जाहीर केले होते, हे विशेष. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवरी जिल्हा पोलिसांचे सर्वात मोठे यश आहे.
नक्षल विरोधी अभियानाच्या यशस्वी कामगिरीबद्दल माहिती देतांना जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेतून माहिती देतांना सांगितले की, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विध्वंसक कारवाया करुन घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मागील तीन ते चार दिवसांपासून काही माओवादी एकत्र येऊन कट रचन्याच्या तयारीत असल्याची माहिती जिल्हा पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारावर गडचिरोली, महाराष्ट्र व नारायणपूर, छत्तीसगड सिमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी तळ ठोकुन असल्याची माहिती सुत्राकडून प्राप्त झाली होती. या माहितीवरुन 19 ऑक्टोबर रोजी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांचे नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाच्या 21 तुकड्या व सिआरपीएफ क्युएटीच्या 2 तुकड्या कोपर्शी जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी माओवाद विरोधी अभियान राबविणेकरीता रवाना करण्यात आले होते. दरम्यान 21 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास कोपर्शी जंगलात दबा धरुन असलेल्या नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरु केला. जवानांनीही चोख प्रतिउत्तर दिले. सदर चकमक तब्बल आठ तास चालली. पोलीसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध मोहिम राबविली असता घटनास्थळावर 2 पुरुष व 3 महिला असे 5 नक्षलींचे मृतदेह आढळून आले होते. मृतक नक्षलीचे मृतदेह जिल्हा मुख्यालयी घेऊन आणल्यानंतर आज, मंगळवारी मृतक नक्षलींची ओळख पटविण्यात आली. यामध्ये कंपनी क्र. 10 ची डिव्हीसीएम असलेली जया ऊर्फ भुरी पदा (31) रा. उलीया, ता. पाखांजूर, जि. कांकेर (छत्तीसगड), सप्लाय टीमचा डिव्हीसीएम सावजी ऊर्फ अंकलु दसरु तुलावी (65) रा. गुरेकसा, ता. धानोरा, जि. गडचिरोली यांचेसह सप्लाय टीमचे सदस्य असलेल्या देवे ऊर्फ रिता (25)वर्षे, रा. बस्तर एरीया (छत्तीसगड), बसंत, रा. बस्तर एरीया (छत्तीसगड) व मृतक डीकेएसझेडसीएम रुपेश मडावी याची अंगरक्षक दलम सदस्य असेली कंपनी क्र. 10 ची सुखमती, रा. बस्तर एरीया (छत्तीसगड) हिचा समावेश आहे.
सदर माओवाद विरोधी अभियान अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती)सुनिल रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी-60 आणि सिआरपीएफ क्युएटीच्या कमांडोंनी यशस्वीपणे पार पाडले.

तीन वर्षात 85 नक्षल्यांना घातले कंठस्नान
सन 2021 पासून गेल्या तीन वर्षात जिल्हा पोलीसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 85 कट्टर माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यासोबतच 109 माओवाद्यांना अटक करण्यात आले असून 37 माओवाद्यांनी केले आहे. सलग 72 तास चाललेल्या या खडतर अभियानादरम्यान सी-60 व क्युएटी जवानांनी दाखविलेल्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.

जया व सावजी या दोघांवर तब्बल 275 गुन्हे दाखल
चकमकीत ठार झालेल्यांमध्ये कंपनी क्र. 10 ची डिव्हीसीएम जया ऊर्फ भूरी पदा तसेच सप्लाय टीमचा डीव्हीसीएम असलेल्या सावजी ऊर्फ अंकलु दसरु तुलावी या जहाल दोन्ही नक्षल्यांवर तब्बल 275 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये जया हिचेवर 31 चकमक, जाळपोळ 3, खून 4, इतर 11 असे एकूण 49 गुन्हे दाखल होते. सावजी ऊर्फ अंकलू याचेवर 84 चकमक, 38 जाळपोळ, 54 खून, इतर 50 असे एकूण 226 गुन्हे दाखल होते. शासनाने दोघांवरही 16-16 लाख असे एकूण 32 लाखांचे बक्षिस जाहीर केले होते.

इतर मृतक नक्षली सप्लाय टिमचे सदस्य
चकमकीत ठार झालेल्या इतर तीन नक्षली सदस्य छत्तीसड राज्यातील नक्षल चळवळीमध्ये सप्लाय टीमचे सदस्य म्हणून कार्यरत होते. यामध्ये देवे ऊर्फ रिता हिचेवर 2 लाखाचे बक्षिस होते. बसंत, रा. बस्तर एरीया (छत्तीसगड) याचा 5 चकमक, 1 जाळपोळ, इतर 4 असे एकूण 10 गुन्ह्यात सहभाग होता. त्याचेवरही शासनाने 2 लाखाचे बक्षिस जाहीर केले होते. तर कंपनी क्र. 10 ची सदस्या असलेली सुखमती हिच्यावरही 2 लाखाचे बक्षिस होते.

5 अग्निशस्त्रासह नक्षल साहित्य जप्त
आठ तास चाललेल्या चकमकीनंतर नक्षल विरोधी अभियान पथकातील जवानांनी घटनास्थळ परिसरात शोध मोहिम राबविली असता 2 पुरुषांसह 3 महिला नक्षलींचे मृतदेह आढळून आले. यासोबतच घटनास्थळ 5 अग्निशस्त्रासह मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात आले.

कोपेर्ला जंगल परिसरात नक्षल्यांसह आठ तास चाललेल्या चकमकीदरम्यान जिल्हा पोलिस दलाचे जवान कुमोद प्रभाकर आत्राम हे जखमी झाले. त्यांना अभियानादरम्यान तातडीने हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून उपचाराकरिता नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here